धर्मापुरी (तमिळनाडू) येथे सरकारी शाळेतील मुख्याध्यापिकेने ख्रिस्ती असल्याचे सांगून तिरंगा फडकावण्यास दिला नकार !

मुख्याध्यापिका तमिळसेल्वी

धर्मापुरी (तमिळनाडू) – येथील एका सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका तमिळसेल्वी यांनी धार्मिक परंपरांचा दाखला देत स्वातंत्र्यदिनी शाळेत तिरंगा फडकावण्यास नकार दिल्याचा त्यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या घटनेनंतर धर्मापुरीचे मुख्य शैक्षणिक अधिकार्‍याकडे तक्रार करण्यात आली आहे. स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याच्या वेळी शिक्षिकेने सुट्टी घेतल्याची तक्रारही या अर्जात करण्यात आली आहे. एवढेच नाही, तर हा प्रकार गत अनेक वर्षांपासून चालू असल्याचेही यात नमूद करण्यात आले आहे. तमिळसेल्वी यंदा सेवानिवृत्त होणार आहेत.

या व्हिडिओमध्ये त्या म्हणत आहेत की, मी यकोबा ख्रिस्ती आहे. या समुदायाची परंपरेनुसार आम्हाला ईश्‍वर वगळता अन्य कुणालाही वंदन करण्याची अनुमती नाही. माझा हेतू राष्ट्रध्वजाचा अवमान करण्याचा नव्हता. मी तिंरग्याचा आदर सन्मान करते; पण माझ्या धर्मात केवळ देवालाच वंदन केले जाते.

संपादकीय भूमिका

देशातील एकातरी हिंदूने आतापर्यंत कधी तो हिंदु असल्याचे सांगून तिरंगा फडकावण्यास आणि त्याला वंदन करण्यास नकार दिला आहे का ? मात्र अन्य धर्मियांकडून अनेकदा विरोध करण्यासह त्याचा अवमान करण्याचे प्रकार घडले आहेत आणि घडत आहेत. यावरून या देशावर कोण प्रेम करतो आणि कोण द्वेष करतो, हे लक्षात येते !