पंढरपूर वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन करणे आवश्यक !

‘महाराष्ट्रातील शेकडो संतांच्या पालख्या आषाढ मासात पंढरपूरला जातात. या पालखी सोहळ्यात लक्षावधी वारकरी प्रस्थानाच्या ठिकाणांपासून २० दिवस ते १ मास पायी चालत असतात. अशा वारकर्‍यांच्या समस्यांकडे सरकारने लक्ष देणे आवश्यक आहे. वर्षातून दोन वेळा पंढरपूर आद्यपूजेचा मान स्वीकारणार्‍या एका तरी मुख्यमंत्र्याने किंवा सरकारने वारकर्‍यांच्या या समस्या सोडवल्या आहेत का ? वारीतील आरोग्यसेवांचे नियोजन पुढीलप्रमाणे होणे आवश्यक आहे.

१. बहुतांश वारकरी ग्रामीण भागातील शेतकरी आणि कामगार वर्गातील असतात. ते आरोग्याविषयी जागरूक नसतात. त्यांच्यात जागरूकता निर्माण करून त्यांना आरोग्य सुविधा पुरवाव्या.

२. वारकर्‍यांचा वयोगट साधारणपणे ४० ते ८० वर्षांचा असतो. विविध आजारांच्या समस्या त्यांना भेडसावत असतात. वारीतील पायी प्रवासाने या समस्यांचे रूपांतर गंभीर आजारात होते. ते होऊ नये, याकरता त्यांच्यावर वेळेवर औषधोपचार करावेत.

३. बहुतांश वारकरी निम्न आर्थिक वर्गातील असल्याने पालखी मार्गावरील रुग्णालयात जाणे त्यांना आर्थिकदृष्ट्या परवडत नाही. ‘पालखी मार्गावरील आधुनिक वैद्य आपल्याकडून अधिक पैसे घेतील’, अशी साशंकता मनात असल्याने वारकरी आजारपण अंगावर काढतात. अशा वारकर्‍यांच्या मनातील शंका दूर करून त्यांना आरोग्य सुविधा पुरवून आधार द्यावा.

४. वारीच्या मार्गावर छोटे-मोठे अपघात होतात. अशा प्रसंगी त्यांना तात्काळ साहाय्य करावे.

५. वारी काळात पावसाळा असतो. मार्गावरील गावात गढूळ आणि अशुद्ध पाणी असते. त्यामुळे वारकर्‍यांमध्ये मोठ्या प्रमाणात साथीचे आजार पसरतात. अशा वेळी त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार करावेत.

६. वारी मार्गावर ४० टक्के वारकरी कोणत्याही प्रकारचे अन्न आणि निवास यांची व्यवस्था समवेत घेत नाहीत. त्यांच्याकडे निवासासाठी तंबू नसतात आणि पुरेसा अन्नसाठाही नसतो. असे वारकरी पालखी मुक्कामाच्या गावी मिळेल त्या ठिकाणी आसरा घेतात, पाऊस नसल्यास उघड्यावरच झोपतात आणि मिळेल ते अन्न सेवन करतात. या वारकर्‍यांचे वयोमान आणि शारीरिक स्थिती यांमुळे असे वारकरी विविध आजारांचे बळी ठरतात. अशा वारकर्‍यांना आधार देऊन त्यांच्यावर तात्काळ औषधोपचार करावेत.

७. एखाद्या वारकर्‍याला हृदयविकाराचा झटका येतो. अशा प्रसंगी त्याच्यावर तात्काळ उपाचार करावेत.’

(साभार : ‘विश्व हिंदु परिषद, पश्चिम महाराष्ट्र, प्रांत-स्मरणिका, मठ-मंदिर संपर्क समिती’)