विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची नियुक्ती !  

विधीमंडळ पावसाळी अधिवेशनाला प्रारंभ !

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई – विधान परिषदेत नवनिर्वाचित राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडला, तसेच ‘विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड करण्यात आली आहे’, अशी घोषणा विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोर्‍हे यांनी केली. विधानसभा आणि विधान परिषद येथे माजी सदस्य अन् माजी उपमंत्री भरतभाऊ बहेकर, बाबूराव पाचर्णे, जनार्दन बोंद्रे, नानासाहेब माने, रावसाहेब हाडोळे आणि उद्धवराव शिंगाडे यांच्या निधनाविषयी शोक प्रस्ताव मांडण्यात आला. विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि शिक्षक आमदार कपिल पाटील यांनी दोन्ही नेत्यांचा जीवनपरिचय करून दिला. सर्वांनी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यावी, असे आवाहन केले.

शिंदे सरकार स्थापन झाल्यानंतर ते प्रथमच पावसाळी अधिवेशनाला सामोरे जात आहे. शिवसेनेतील बंडखोरीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे एकाच पक्षाचे मात्र विरोधकांच्या भूमिकेत असणार आहेत. कामकाजाला प्रारंभ झाल्यानंतर प्रारंभी काही सदस्यांनी एम्.पी.एस्.सी, बी.एड्. आणि सीईटी विद्यार्थ्यांची हानी होऊ नये; म्हणून ‘एम्.पी.एस्.सी, बी.एड्. आणि सीईटी परीक्षा कधी घेणार ?’, असा प्रश्न उपस्थित केला. त्याला उत्तर देतांना उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी ‘या तिन्ही परीक्षा एकाच दिवशी घेण्यात येतील’, असे सांगितले.

उपसभापतींच्या भाषणाच्या वेळी आमदार शशिकांत शिंदे यांच्या भ्रमणसंगणकात विधानसभेचे भाषण चालू झाल्याने गोंधळ !

विधान परिषदेत उपसभापती नीलम गोर्‍हे या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड यांचा जीवनपट मांडत असतांनाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या भ्रमणसंगणकात (लॅपटॉप) विधानसभेचे भाषण चालू झाले. अचानक चालू झालेले भाषण शिंदे यांना त्वरित बंद न करता आल्याने त्यांची तारांबळ उडाली. विरोधी पक्षातील सदस्य एकनाथ खडसे, भाई जगताप, अमोल मिटकरी आदी आमदार शिंदे यांना साहाय्य करण्यासाठी धावून आले. पुष्कळ प्रयत्न करूनही ‘व्हिडिओ’ बंद होत नव्हता. त्यामुळे काही काळासाठी गोंधळ निर्माण झाला. हा गोंधळ पाहून उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी ‘सभागृहातील सदस्यांना बारीक आवाजाकडे लक्ष देऊ नका. येथे मोठ्या आवाजाने बोलत आहे, ते ऐका’, अशी टिपण्णी केली. तोपर्यंत ‘व्हिडिओ’ही बंद झाला.

पहिल्याच दिवशी विरोधी पक्षाकडून विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन !

मुंबई, १७ ऑगस्ट (वार्ता.) – ‘ईडी सरकार हाय हाय’, ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशा घोषणा देत विरोधी पक्षाकडून विधीमंडळाच्या पायर्‍यांवर आंदोलन करून सरकारचा निषेध करण्यात आला. यामध्ये शिवसेनेच्या शिंदेगटाचे आमदार, तसेच काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सहभागी झाले होते. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला १७ ऑगस्ट या दिवशी प्रारंभ झाला.

राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव !  

विधानसभेत राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडला. काही वेळ कामकाज झाले. यानंतर ‘विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत आहे’, असे सांगितले.