श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी शाही ईदगाह मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास अनुमती द्या !

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा यांची रक्ताने पत्र लिहून योगी आदित्यनाथ यांच्याकडे मागणी

अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा

मथुरा (उत्तरप्रदेश) – येथील श्रीकृष्णजन्मभूमीवरील शाही ईदगाह मशिदीमध्ये श्रीकृष्णजन्माष्टमीच्या दिवशी भगवान श्रीकृष्णाची पूजा करण्यास अनुमती द्या, अशी मागणी अखिल भारतीय हिंदु महासभेचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष दिनेश शर्मा यांनी उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना स्वतःच्या रक्ताने लिहिलेल्या पत्राद्वारे केली आहे. ‘जन्मस्थान नसलेल्या ठिकाणी आजवर श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. श्रीकृष्णजन्मभूमीत पूजेची अनुमती नाकारल्यास जगणे व्यर्थ आहे. मला मरण्याची अनुमती द्या’, अशी मागणी शर्मा यांनी या पत्रात केली आहे.

१. योगी आदित्यनाथ हे हनुमानाचा अवतार असल्याचे दिनेश शर्मा यांनी म्हटले आहे.

२. ‘मशिदीमध्ये श्रीकृष्णाची पूजा करण्यास योगी आदित्यनाथ अनुमती देतील’, असा विश्‍वासही शर्मा यांनी व्यक्त केला आहे.

३. यापूर्वीच श्रीकृष्णजन्मभूमी संदर्भात न्यायालयात अनेक याचिका प्रविष्ट करण्यात आल्या आहेत. ‘केशव देव मंदिराच्या जागेवर शाही ईदगाह मशीद बनवण्यात आली असून ती हटवण्यात यावी’, अशी मागणी हिंदु याचिकाकर्त्यांनी न्यायालयात केली आहे. मुसलमान पक्षाने या याचिकेचा विरोध केला आहे.

४. शर्मा यांनी वरिष्ठ विभागाच्या दिवाणी न्यायालयातील न्यायाधीश ज्योती सिंह यांच्याकडे १८ मे या दिवशी विनंती याचिका करून शाही ईदगाह मशिदीमध्ये बाळकृष्णाला अभिषेक करण्याची अनुमती मागितली होती.