भारताच्या विरोधानंतरही श्रीलंकेकडून चीनच्या हेरगिरी करणार्‍या युद्धनौकेला हिरवा कंदिल !

चीन या नौकेद्वारे भारताच्या संरक्षण यंत्रणांची माहिती मिळवण्याची शक्यता !

युआन वांग ५

कोलंबो (श्रीलंका) – भारताने केलेल्या प्रखर विरोधानंतरही श्रीलंकेने अंततः चीनच्या हेरगिरी करणार्‍या ‘युआन वांग ५’ या युद्धनौकेला त्याच्या हंबनटोटा बंदरात येण्याची अनुमती दिली आहे. १६ ते २२ ऑगस्ट या कालावधीत ही नौका या बंदरात येणार आहे. भारताने यापूर्वीच या नौकेला बंदरात येण्याची अनुमती देण्यावरून श्रीलंकेकडे आक्षेप नोंदवला होता. त्यानंतर श्रीलंकेने चीनला या नौकेची श्रीलंकेभेट लांबणीवर टाकण्याची विनंती केली होर्ती परंतु आता श्रीलंकेने या नौकेला स्वतःच्या बंदरात येण्याची क अनुमती दिली आहे. यापूर्वी ही युद्धनौका ११ ऑगस्ट या दिवशी श्रीलंकेतील हंबनटोटा बंदरात येऊन तेथे १७ ऑगस्टपर्यंत इंधन भरण्यासाठी थांबणार होती. ‘युद्धनौकेला अनुमती देण्याचे प्रकरण श्रीलंका सरकारने योग्यरित्या हाताळले नाही’, अशी टीका तेथील विरोधकांनी केली आहे.

१. चीनची ‘युआन वांग ५’ ही युद्धानौका सागरी क्षेपणास्त्रे आणि उपग्रह यांचा माग काढणारी नौका आहे. त्यामुळे भारताने तिच्या श्रीलंकेमधील थांब्यावरून आक्षेप घेतला होता. ‘ही युद्धनौका श्रीलंकेला जातांना हेरगिरी करून भारताच्या संरक्षण यंत्रणांची माहिती मिळवेल’, अशी चिंता भारताने व्यक्त केली होती.

२. श्रीलंकेने दिलेल्या अनुमतीविषयी भारताच्या परराष्ट्र खात्याचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनी सांगितले की, श्रीलंका हा सार्वभौम देश असून तो त्याचे निर्णय स्वतंत्रपणे घेत असतो; पण भारताच्या लगतच्या प्रदेशांतील, तसेच सीमाभागांतील परिस्थिती लक्षात घेता भारत सुरक्षिततेविषयी स्वतःची सूत्रे मांडत असतो. (भारताने सूत्र मांडले, तर ते शेजारील देशांनी ‘आदेश’ म्हणून स्वीकारले पाहिजे, अशी पत भारताची असली पाहिजे, असेच भारतियांना वाटते ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • भारताच्या विरोधानंतरही जर श्रीलंका भारताच्या शत्रू देशापुढे नांगी टाकत असेल, तर भारतानेही श्रीलंकेचे नाक दाबण्याची आवश्यकता आहे अन्यथा भारतीय उपखंडावर भारताऐवजी चीनचे वर्चस्व आहे, असे जगाला वाटेल !
  • चीनने भारताच्या शेजारील देशांवर वर्चस्व मिळवून त्यांना स्वतःच्या अधिपत्याखाली ठेवणे, हे भारतासाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या समस्येवर भारताने वेळीच उपाय काढणे आवश्यक आहे !