‘लाल सिंग चढ्ढा’ चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अवमान; देहलीतील अधिवक्त्यांकडून पोलिसांत तक्रार प्रविष्ट

अधिवक्ता विनित जिंदाल (डावीकडे) अभिनेते आमीर खान (उजवीकडे)

देहली – आमीर खान यांच्या नुकताच प्रदर्शित झालेला ‘लाल सिंग चढ्ढा’ या चित्रपटात भारतीय सैन्य आणि हिंदु समाज यांचा अपमान करण्यात आल्याची तक्रार येथील अधिवक्ता विनित जिंदाल यांनी देहलीचे पोलीस आयुक्त संजय अरोरा यांच्याकडे केली. आमीर  खान, चित्रपटाचे वितरक असलेले ‘पॅरामाउंट पिक्चर्स’, दिग्दर्शक अद्वैत चंदन आदींविरुद्ध ही तक्रार करण्यात आली आहे.

या तक्रारीत म्हटले आहे की,

१. चित्रपटात आक्षेपार्ह दृश्ये आहेत. या चित्रपटात असे दाखवण्यात आले आहे की, ‘मानसिकदृष्ट्या अपंग व्यक्तीला सैन्यात भरती करण्यात आले आणि तिला कारगिल युद्ध लढण्याची अनुमतीदेखील देण्यात आली.’

सैन्यात सर्वोत्तम सैनिकांची निवड केली जाते आणि कठोर प्रशिक्षण घेतलेल्यांनाच युद्धात लढण्यासाठी पाठवले जाते, हे सर्वांना ठाऊक आहे. या चित्रपटाद्वारे भारतीय सैन्याची अपकीर्ती करण्यासाठी निर्मात्यांनी जाणीवपूर्वक हे दृश्य दाखवले आहे.

२. चित्रपटात आणखी एका दृश्यात पाकिस्तानी सैन्याचा सैनिक लालला म्हणतो, ‘मैं नमाज पढा हूं लाल, तुम ऐसा क्यों नहीं करते ?’ प्रत्युत्तरात लाल सांगतो, ‘‘आई म्हणते की, हे सर्व पूजा-पाठ मलेरिया आहे. त्यामुळे दंगली होतात.’’ भारतीय संविधानाने प्रत्येक नागरिकाला अभिव्यक्ती स्वातंत्र्य दिले आहे; परंतु त्याचा गैरवापर करणे चुकीचे आहे. हे दृश्य धर्माच्या आधारावर नागरिकांना भडकवते. हा गंभीर गुन्हा आहे.

३. आमीर खान यांच्या या वक्तव्यामुळे हिंदु समाज दुखावला गेला आहे. आमीर खान यांच्यामुळे देशाची सुरक्षा, शांतता आणि बंधुत्व यांना धोका आहे.

४. अशा परिस्थितीत आमीर खान, ‘पॅरामाउंट पिक्चर्स’ आणि इतर यांच्याविरुद्ध कलम १५३, १५३ ए, २९८ आणि ५०५ अंतर्गत प्रथमदर्शी अहवाल नोंदवण्याची मागणी करण्यात आली आहे.

संपादकीय भूमिका

  • चित्रपटात सैन्यविरोधी आणि हिंदुविरोधी वाक्य असतांना केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाने याला प्रमाणपत्र दिलेच कसे ? असे एखादे वाक्य मुसलमानांच्या विरोधात असते, तर एव्हाना काय झाले असते, हे वेगळे सांगायला नको !
  • या चित्रपटाचे निर्माते, दिग्दर्शक आणि अभिनेते यांच्यावर कठोर कारवाई झाली, तरच हिंदु धर्माचा अशा प्रकारे जाणीवपूर्वक अवमान करण्याचे प्रकार थांबतील !