असदुद्दीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणार्‍यांना सशर्त जामीन !

एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असद्दुदीन ओवैसी

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीच्या वेळी एम्.आय.एम्. पक्षाचे अध्यक्ष आणि खासदार असद्दुदीन ओवैसी यांच्यावर गोळीबार करणार्‍या दोघांना सशर्त जामीन देण्यात आला आहे. प्रयागराज येथील न्यायालयाने आरोपी शुभम आणि सचिन यांना ‘साक्षीदारांना धमकावू नये’, तसेच ‘न्यायालयीन प्रकरणात कोणताही हस्तक्षेप करू नये’, या अटींवर जामीन संमत केला.

येथील हापुड टोल नाक्याजवळ ओवैसी आले असता शुभम आणि सचिन या दोघांनी त्यांच्या गाडीवर गोळीबार केला होता. त्यात ओवैसी बचावले होते. या आक्रमणाचा व्हिडिओ ओवैसी यांनी स्वत: प्रसारित केला होता. पोलिसांनी एकाला घटनास्थळावरून अटक केली होती, तर दुसर्‍याने पोलिसांकडे स्वत:ला नंतर स्वाधीन केले होते. अन्वेषणाच्या वेळी आरोपी सचिन याने पोलिसांना सांगितले होते की, ओवैसी यांचा भाऊ अकबरुद्दीन याने वर्ष २०१४ मध्ये, ‘ताजमहाल आणि कुतुब मिनार हे आमच्या बाप-दादांचे आहे !’, असे वक्तव्य केले होते. ते सचिनला आवडले नसल्याने त्याने असदुद्दीन ओवैसी यांच्यावर आक्रमण केले होते.