महागाईवरील ‘ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांची केंद्र सरकारवर टीका
गौहत्ती (आसाम) – भारताचा पैसा अर्थमंत्र्यांकडे आहे. एखादी व्यक्ती खरेदी करण्यासाठी नेमका किती पैसा खर्च करते, हे त्यांना कसे कळणार ? मंत्र्यांसाठी महागाई कधीच नसते, अशी ‘टीका ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंट’चे अध्यक्ष मौलाना बदरुद्दीन अजमल यांनी अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांच्यावर केली. ‘भाजपच्या खासदारांनी त्यांच्या पत्नींना विचारावे की, त्या स्वयंपाकघर कसे चालवतात ?’ असा सल्लाही त्यांनी दिला. देशातील महागाईच्या विषयावर लोकसभेत झालेल्या चर्चेच्या वेळी ‘देशाची आर्थिक स्थिती चांगली आहे’, असे विधान अर्थमंत्री निर्मला सीतारामन् यांनी केले होते. यावर काँग्रेससह इतर विरोधी पक्षांकडून टीका करण्यात आली होती. त्यावरूनच अजमल यांनी वरील विधान केले.
अजमल पुढे म्हणाले की, महागाईच्या विषयावरूनच भाजप सत्तेत आला; मात्र आता ८ वर्षांच्या त्यांच्या सत्ताकाळात महागाईने उच्चांक गाठला आहे. जीवनावश्यक वस्तूंचे दर दुपटीने वाढले आहेत. त्यामुळे गरिबांचे हाल होत आहेत. सरकारने महागाईची वेळीच नोंद न घेतल्यास वर्ष २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत महागाई सरकारला खाऊन टाकेल, अशी चेतावणीही त्यांनी दिली.