साधकांना देवाच्या अनुसंधानात रहाण्याचे महत्त्व सांगून त्यांना घडवणारे रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील पू. भगवंत कुमार मेनराय (वय ८४ वर्षे) !

‘४ ते १०.१०.२०२१ या कालावधीत मी पू. भगवंत मेनराय यांच्या सेवेत असतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

पू. भगवंतकुमार मेनराय

१. पू. मेनरायकाकांनी सांगितलेले अखंड नामजप करण्याचे महत्त्व

पू. काकांनी ‘नामजप एकाग्रतेने होण्यासाठी तो श्वासाला कसा जोडायचा ?’, हे मला शिकवले. प्रत्येक कृती करतांना माझे श्वासाकडे लक्ष गेल्यावर माझा नामजप चालू होत होता. पू. काकांनी माझ्या मनाची प्रक्रिया करवून घेतली. त्यांनी मला विचारले, ‘‘चुका का होतात ?’’ मी त्यांना सांगितले, ‘‘माझ्यातील स्वभावदोष आणि अहं यांमुळे चुका होतात.’’ तेव्हा त्यांनी सांगितले, ‘‘स्वभावदोष आणि अहं यांचे मूळ ‘अपेक्षा करणे’ यात आहे. मनात ‘अपेक्षेचे विचार येऊ नयेत’, यासाठी जी कृती करतांना मनात अपेक्षा येत असेल, त्या कृतीकडे साक्षीभावाने बघ, म्हणजे देवाण-घेवाण वाढणार नाही आणि साधना वाचेल. ‘मनात कोणताही अनावश्यक विचार येऊच नये’, यासाठी सतत नामजप करायला हवा. देवाच्या अनुसंधानात रहाण्याव्यतिरिक्त अन्य कोणतेही सोपे साधन नाही. तेव्हापासून माझी नामजपाप्रती श्रद्धा वाढून माझे नामजप करण्यातील सातत्य वाढले.

२ ‘ईश्वरेच्छेने कृती केल्यास देव साधनेची काळजी घेतो’, हे अनुभवता येणे

माझी पू. काकांकडे सेवेला जाण्याची वेळ सकाळी साडेनऊ वाजताची होती. त्या आधी मी दैनंदिनी लिहिण्याचे नियोजन केले होते. एकदा पू. काकांकडे सेवेला असणार्‍या आधीच्या साधकाने मला विचारले, ‘‘सेवेच्या वेळेच्या १५ मिनिटे आधीच सेवेला येऊ शकतोस का ?’’ तेव्हा माझ्या मनात ‘हा माझा वैयक्तिक वेळ आहे. लवकर गेल्यास माझी व्यष्टी साधनेची सूत्रे अपूर्ण रहातील’, असा विचार येत असतांनाच ‘संतसेवेला प्राधान्य द्यायला हवे’, असा तीव्र विचार मनात येऊन मी सेवेला गेलो. तेव्हा पू. काका स्वतःहून मला म्हणाले, ‘‘अरे, आज लवकर आलास का ? मी अल्पाहार करीपर्यंत बाहेर बसून १५ मिनिटे नामजप कर.’’ तेव्हा ‘देवाला माझा मनोलय करवून घ्यायचा होता. माझ्या साधनेची काळजी त्यालाच अधिक आहे’, असा विचार आला आणि ‘परिस्थिती स्वीकारल्यावर देव कृपा करतो’, हे मला शिकता आले.

३. देवाच्या अनुसंधानात रहाता येण्यासाठी त्याच्याप्रती प्रेम वाटायला हवे !

श्री. हेमंत पुजारे

एकदा ४ दिवस मी एकटाच पूर्णवेळ पू. मेनरायकाकांच्या सेवेत होतो. ४ दिवस झाल्यावर ‘अन्य साधक साहाय्याला येणार असल्याने आता मला इथून काही वेळ खोलीबाहेर जाता येईल’, असा विचार येऊन मला आनंद झाला. पुढच्याच क्षणी मला वाटले, ‘मी संतसेवेत आहे. येथून बाहेर जाण्याच्या विचाराने मला आनंद का होत आहे ? मला संतसेवेत ठेवले आहे, तर मला आनंद व्हायला हवा होता. ‘मला देवाच्या समवेत दिवसभर ठेवले, तर मी राहू शकतो का ?’, असा विचार केल्यावर माझ्या अंतरातून ‘नाही’, असे उत्तर आले.

मी पू. काकांना माझ्या मनातील विचार सांगितले. तेव्हा ते म्हणाले, ‘‘आपल्याला देवाविषयी प्रेम वाटत असेल, तरच आपण त्याच्या समवेत अखंड राहू शकतो. आपल्याला सर्वांविषयी तसे प्रेम वाटायला हवे.’’ तेव्हापासून माझ्याकडून सर्वांविषयी प्रेम वाटण्यासाठी प्रयत्न चालू झाले. त्यानंतर ‘पू. काकांची सेवा आणखी ७ दिवस करायची आहे’, असे मला समजले. तेव्हा मला पुष्कळ आनंद झाला आणि ‘गुरुदेवांनी हा प्रसाद दिला आहे’, असे मला वाटले.

४. संतसेवेत असतांना झालेल्या चुकांविषयी केलेले चिंतन आणि त्यावर पू. काकांनी दिलेला दृष्टीकोन !

४ अ. ‘प्रतिमेच्या विचारामुळे संतांशी वागण्यात सहजता रहात नसल्याने चुका होतात’, असे लक्षात येणे : माझ्या मनात ‘संतसेवेत चुका व्हायला नकोत’, अशी भीती असायची. त्यामुळे माझ्या सेवेत सहजता नसून उतावळेपणा असायचा आणि त्यामागे प्रतिमेचे विचारही असायचे. एकदा पू. काका मला खणातून काहीतरी काढण्यास सांगत होते. तेव्हा त्यांचे बोलणे पूर्ण होण्याआधीच मी खणात शोधण्यासाठी जात होतो. तेव्हा त्यांनी मला थांबवले आणि विचारले, ‘‘मी काही सांगितले नसतांनाच तू शोधायला का जात आहेस ?’’ त्यांनी मला त्या कृतीवर चिंतन करायला सांगितले. तेव्हा ‘मनातील प्रतिमेच्या विचारामुळे संतसेवेत सहजता रहात नाही’, हे माझ्या लक्षात आले.

४ आ. ‘नामजप करून देवाच्या अनुसंधानात राहिल्यास देव योग्य कृती करायला सुचवतो’, असे पू. मेनरायकाकांनी सांगणे : मी पू. काकांना चिंतन सांगितल्यावर ते म्हणाले, ‘‘नामजप करून देवाच्या अनुसंधानात राहिल्यास देव योग्य कृती करायला सुचवतो. नामजप करत कृती केल्यावर चुका होणार नाहीत आणि त्याविषयी वाटणारी भीतीही दूर होईल.’’ त्यांनी मला पुन्हा नामजपाचे महत्त्व सांगितले. त्यानंतर माझा ‘पू. काका जे सांगतात, ते ऐकणे, हीच साधना आहे’, हा विचार वाढला. त्याप्रमाणे केल्यावर माझी सेवेतील एकाग्रता वाढून पू. काकांची सेवा करतांना सहजताही पुष्कळ वाढली आणि माझ्या मनात त्यांच्याप्रतीच्या कृतज्ञता भावातही वृद्धी झाली.

५. अनुभूती

प्रार्थना करून नामजप करतांना ‘पू. मेनरायकाकांच्या ठिकाणी भगवान शिव एकावर एक हात ठेवून ध्यानस्थ बसला आहे’, असे दिसणे : ८.१०.२०२१ या दिवशी मी दुपारी पू. काकांच्या समोर बसून नामजप करत होतो. तेव्हा मी प्रार्थना केली, ‘पू. मेनरायकाकांच्या माध्यमातून मला भगवान शिवाचे तत्त्व ग्रहण करता येऊन माझे आध्यात्मिक त्रास दूर होऊ देत.’ काही वेळाने मी डोळे बंद केल्यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘पू. मेनरायकाकांच्या ठिकाणी भगवान शिव एकावर एक हात ठेवून ध्यानस्थ बसला आहे. त्यांच्यातून आकाशी आणि निळ्या या रंगांच्या लहरी प्रक्षेपित होत आहेत.’ तेव्हा माझा नामजप आतून होऊ लागला. आधी पू. काका दोन्ही पाय सोडून बसले होते. मी डोळे उघडल्यावर मला दिसले, ‘पू. काका मांडी घालून हातावर हात घेऊन भगवान शिवाप्रमाणेच बसले आहेत.’ त्यांचा गळा आणि हात यांतील माळा म्हणजे ‘शिवाच्या देहावरील सर्प आहेत’, असा विचार येऊन मला आनंद वाटत होता.

गुरुदेवांनी मला या सेवेला पात्र समजून मला सेवा देऊन माझ्यावर कृपा केली आणि मला घडवले. याबद्दल मी गुरुदेव  आणि पू. मेनरायकाका यांच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. हेमंत पुजारे, मुंबई (१०.१०.२०२१)

पू. भगवंत कुमार मेनराय यांनी साधकांचा नामजप एकाग्रतेने होण्यासाठी सांगितलेली अमूल्य सूत्रे !

‘पू. भगवंत मेनराय साधकांसाठी नामजप करतात. त्या वेळी त्यांनी नामजप परिणामकारक होण्याविषयी सांगितलेली अमूल्य सूत्रे पुढे दिली आहेत.

श्री. अजित महांगडे

१. नामजप करत असतांना श्वासावर लक्ष केंद्रित करावे आणि त्याला नामजप जोडावा. नामजपाला श्वास जोडण्याचा प्रयत्न करू नये; कारण तसे करतांना लय साधली गेली नाही, तर गुदमरल्यासारखे होईल.

२. नामजप करतांना मनात विचार येत असल्यास सूक्ष्मातून हवेत किंवा समोरील भिंतीवर नामजप लिहावा आणि तो पुनःपुन्हा वाचावा. त्यानंतर तो श्वासाला जोडावा. असे केल्याने नामजप एकाग्रतेने होतो.’

– श्री. अजित महांगडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२२.७.२०२२)

  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक