अकोला येथील रिपाई आठवले गटाचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे बलात्काराचा गुन्हा नोंद झाल्यावर पसार !

अकोला – येथील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) याचे महानगराध्यक्ष गजानन कांबळे यांच्यावर ३ ऑगस्ट या दिवशी रामदास पेठ पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. शहरातील विविध उपाहारगृहांत कांबळे यांनी पीडित तरुणीला विवाहाचे आमीष दाखवून अत्याचार केल्याचा, तसेच हा प्रकार कुणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.

पीडित तरुणी याच पक्षाच्या एका महिला पदाधिकार्‍याची मुलगी आहे. गुन्हा नोंद झाल्यावर कांबळे पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आरोपी कांबळे हे रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांचे निकटवर्तीय आहेत. त्यांच्यावर यापूर्वीही खून आणि मारहाण यांसह अनेक गंभीर गुन्हे नोंद आहेत. कांबळे यांनी नवी देहली येथे झालेल्या ‘हर घर तिरंगा’ कार्यक्रमात रामदास आठवले यांच्यासमवेत उपस्थिती लावल्याचे छायाचित्र समोर आले आहे.

संपादकीय भूमिका

बलात्कार आणि खून यांचा आरोप असणारे पदाधिकारी असणारे पक्ष जनहित कधीतरी साधू शकतील काय ?