राहुल गांधी यांनी घेतली लिंगायत समुदायाची दीक्षा !

कर्नाटकमधील आगामी विधानसभेच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर लिंगायत समुदायाला आकर्षित करण्याचा गांधी यांचा खटाटोप !

बेंगळुरू – काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी हे ३ ऑगस्ट या दिवशी कर्नाटकच्या चित्रदुर्ग येथे आले होते. तेथील मुरुघा मठामध्ये जाऊन त्यांनी लिंगायत समुदायाचे धर्मगुरु डॉ. श्री शिवमूर्ति मुरुघ शरणारू यांची भेट घेतली. या वेळी गांधी यांनी त्यांच्याकडून लिंगायत समुदायाची ‘लिंग दीक्षा’ही घेतली. याआधी गांधी यांनी स्वत:ला काश्मिरी हिंदू’, ‘जनेऊधारी ब्राह्मण’, तसेच ‘दत्तात्रेय गोत्रवाले ब्राह्मण’, म्हणवून घेतले होते. यामुळे ‘हिंदूंची मते मिळवण्यासाठी गांधी यांची ही राजकीय खेळी आहे’, अशी टीका सामाजिक माध्यमांतून त्यांच्यावर करण्यात आली.

या वेळी गांधी म्हणाले, मी गेल्या काही कालावधीपासून लिंगायत समुदायाचे संस्थापक बसवण्णाजी यांच्याविषयी अभ्यास करत आहे. त्यामुळे चित्रदुर्ग येथील मठात येणे मी भाग्य समजतो. माझी आपल्याला विनंती आहे की, मझ्याकडे अशी एक व्यक्ती पाठवून द्या, जी मला ‘इष्टलिंग’ आणि ‘शिवयोग’ यांच्या संदर्भात सविस्तर माहिती देईल. याने मला कदाचित् लाभ होईल.

कर्नाटकमध्ये लिंगायत समाजाची लोकसंख्या १८ टक्क्यांहून अधिक !

‘कर्नाटकात पुढील वर्षी विधानसभेच्या निवडणुका होणार असून राज्याच्या एकूण लोकसंख्येत लिंगायत समुदाय १८ टक्क्यांहून अधिक आहे. त्यामुळेच गांधी अशा प्रकारे या सुमदायाची मते मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असे राजकीय विश्‍लेषकांचे मत आहे.

संपादकीय भूमिका 

निवडणुका आल्यावर राहुल गांधी यांना हमखास धार्मिकता आठवते, हे यापूर्वी अनेकदा दिसून आले आहे ! तथापि जनतेलाही काँग्रेसचे खरे स्वरूप माहीत असल्यानेच काँग्रेसने धार्मिकतेचा कितीही आव आणला, तरी जनता काँग्रेसला निवडून देणार नाही, हेही तितकेच सत्य आहे !