राजस्थान येथे पोलीस हवालदाराला लाच घेतांना रंगेहात पकडले

बंसूर पोलीस ठाण्यातील हवालदार सुरेश कुमार

बंसूर (राजस्थान) – येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने बंसूर पोलीस ठाण्यातील हवालदार सुरेश कुमार याला १ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक विजय सिंह मीणा यांनी सांगितले की, हरसोली (कोटकासिम) येथील महिला मुकेश देवी यांनी १ ऑगस्ट २०२२ या दिवशी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याकडे तक्रार केली की, त्यांचे पती सतीश कुमार जाट यांच्या विरोधात बंसूर पोलीस ठाण्यात नोंदवलेल्या बलात्काराच्या गुन्ह्यात त्यांची अटक टाळण्यासाठी १ लाख ४० सहस्र रुपयांची लाच मागितली जात आहे. तसेच पोलीस निरीक्षक रवींद्र काविया यांनी त्यांच्या पतींना गेल्या १७ दिवसांपासून अवैधरित्या पोलीस ठाण्यात बसवून ठेवले आहे. (अशा कायदाद्रोही पोलिसांनाच आजन्म कारागृहात ठेवले पाहिजे ! – संपादक) या तक्रारीच्या आधारे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची सत्यता पडताळण्याचे काम पोलीस उपअधीक्षक महेंद्र मीणा यांच्या नेतृत्वाखालील एका पथकाकडे सोपवले. पूर्व नियोजनानुसार मुकेश देवी यांनी लाचेची रक्कम पोलीस हवालदार सुरेश कुमार यांच्याकडे सुपुर्द केली. त्याचवेळी आधीच त्या ठिकाणी तैनात असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने त्याला १ लाख ४० सहस्र रुपयांची लाच घेतांना रंगेहात पकडले. या कारवाईनंतर त्या पोलीस ठाण्याचे अधिकारी रवींद्र काविया आणि देवी सिंह बेपत्ता असल्याचे आढळून आले. सतीश कुमार जाट यांना १७ दिवसांपासून अवैधरित्या पोलीस ठाण्यात बसवून ठेवल्याविषयी पोलीस निरीक्षक रवींद्र काविया यांना निलंबित करण्यात आले आहे.

संपादकीय भूमिका

भ्रष्टाचारग्रस्त पोलीस दल ! सरकारने या कृत्यात सहभागी दोषी पोलिसांची सर्व संपत्ती जप्त करून त्यांची समाजात ‘छी-थू’ होईल, असे केले पाहिजे, तरच इतरांवर वचक बसेल !