तमिळनाडूमध्ये एल्.टी.टी.ई. सारखी संघटना निर्माण करण्याचा प्रयत्न

चेन्नई (तमिळनाडू) – तमिळनाडूमध्ये मे मासांत पकडण्यात आलेल्या नवीन चक्रवर्ती आणि संजय प्रकाश या दोन तरुणांच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने (एन्.आय.ए.ने) केलेल्या चौकशीत त्यांनी ‘लिबरेशन टायगर ऑफ तमिल ईलम्’ (एल्.टी.टी.ई.) सारखी संघटना सिद्ध करून सशस्त्र संघर्ष करण्याची योजना आखल्याचे उघडकीस आले. यानंतर एन्.आय.ए.ने गुन्हा नोंदवून प्रतिबंधित संघटनेशी संबंध असल्याविषयी अधिक अन्वेषण चालू केले आहे. या दोघांच्या संपर्कात असलेल्या इतर लोकांचीही चौकशी चालू आहे.

मे मासात वाहन तपासणीच्या वेळी पोलिसांना या दोघांचा संशय आल्याने पोलिसांनी त्यांना कह्यात घेऊन त्यांची चौकशी केली. तेव्हा त्यांनी दिलेल्या जबाबाच्या आधारे ते ज्या घरी रहात होते, तेथे पिस्तूल, बंदूक बनवण्याची साधने, चाकू, मास्क आणि स्फोटके सापडली. ‘निसर्गाचा र्‍हास रोखण्यासाठी आपण बंदुका सिद्ध करत आहोत’, असे त्यांनी सांगितले. त्यांच्या अधिक चौकशीत त्यांना साथ देणार्‍या कपिलर या महाविद्यालयीन मित्राला पोलिसांनी अटक केली. यानंतर हे प्रकरण एन्.आय.ए.कडे सोपवण्यात आले आहे.