समितीच्या प्राथमिक अहवालाचा निष्कर्ष
मुंबई – इंदूर येथून येणारी एस्.टी. महामंडळाची बस १८ जुलै या दिवशी नर्मदा नदीत कोसळून १२ जणांचा मृत्यू झाला होता. ‘एस्.टी. चालकाने गाडीच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करत असतांना हा अपघात झाला’, अशी माहिती महामंडळाने नियुक्त केलेल्या समितीने प्राथमिक अहवालामध्ये दिली आहे. या घटनेत चालकावर निष्काळजीपणाचा ठपका ठेवण्यात आला आहे.
या अपघातात १० प्रवासी, एस्.टी. चालक आणि वाहक यांचा मृत्यू झाला होता. अपघाताची महामंडळाकडून चौकशी करण्यासाठी त्रिसदस्यीय समिती नेमण्यात आली होती. समितीने प्राथमिक अहवाल दिल्याचे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक शेखर चन्ने यांनी सांगितले. यानुसार वरील निष्कर्ष काढण्यात आला. ‘अंतिम अहवाल लवकरच सादर केला आहे’, असेही चन्ने यांनी सांगितले.