चीनच्या आक्रमक कारवायांना भारताने दिलेले प्रत्युत्तर !

चीनच्या कुरापतींना रोखण्यासाठी सरकारसह देशातील जनतेने चिनी वस्तूंवर बहिष्कार घालून त्याला धडा शिकवावा !

 

१. भारतावर मानसिक दबाव निर्माण करण्यासाठी चीनने सीमाभागात विविध शस्त्रास्त्र कवायती करणे आणि भारताची युद्धसज्जता उत्तम असल्याने चीनच्या कृत्यांचा भारतावर कोणताही परिणाम होणार नसणे

(निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन

अ. ‘नुकतेच एक वृत्त आले की, भारत आणि चीन यांच्यातील कोर कमांडरच्या (उच्च अधिकार्‍यांच्या) स्तरावरील वाटाघाटींमधून काहीही निष्पन्न झाले नाही. तसेच चिनी सैन्य भारताच्या आत ज्या दोन ठिकाणी घुसले होते, तेथून ते परत जायला सिद्ध नाही. तरीही या वाटाघाटी चालूच रहाणार आहेत. आतापर्यंत १६ वाटाघाटी झाल्या आणि पुढेही होतील; परंतु चीन सीमावाद कधीही थांबवणार नाही. याद्वारे चीनला भारतावर सतत दबाव ठेवून त्याच्या आर्थिक प्रगतीत अडथळे निर्माण करायचे आहेत. त्यामुळे हा सीमावाद येणार्‍या काळात थांबण्याची शक्यता अल्प आहे. त्यासाठी भारताने सिद्ध रहायला पाहिजे.

आ. दुसरे वृत्त असे की, चीन त्याच्या काही अत्याधुनिक ‘रॉकेट लाँचर’ची त्या भागात चाचणी करत आहे. हेही एक मानसिक युद्ध असून त्या माध्यमातून चीन भारताला घाबरवण्याचा प्रयत्न करत आहे. याचीही चिंता नको; कारण पारंपरिक युद्धासाठी भारतीय सैन्य सिद्ध आहे.

इ. चीनने शिनझियांगमध्ये ‘रॉकेट माईन’चे सादरीकरण केल्याचे अजून एक वृत्त आले आहे. अर्थात् त्याचाही भारतावर परिणाम होणार नाही. उलट त्याचा परिणाम शिनझियांगच्या लोकांवरच होईल. त्या प्रांतात रहाणार्‍या २० लाखांहून अधिक मुसलमानांना चीनने कारागृहात टाकलेले आहे. त्यांना कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य मिळत नाही.

ई. त्या पुढील वृत्त असे की, लडाखमधील पेंगाँग त्सो सरोवराच्या बाजूला चिनी सैनिक सराव करत होते. सरोवराचा ३३ टक्के भाग भारताच्या हद्दीत आहे. त्यावर संपूर्ण नियंत्रण मिळवण्याच्या दृष्टीने ते सराव करत होते. त्याचीही काळजी करायला नको; कारण असे अनेक सराव भारताने यापूर्वी पाहिले आहेत. हा चीनचा केवळ दिखावा असतो. त्यांची युद्ध लढण्याची क्षमताच नाही.

२. चीनच्या आक्रमक कारवायांना प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय सैन्य चीनच्या विरोधात अधिक आक्रमक होणे

लवकरच भारत आणि अमेरिका याच भागात सराव करणार आहेत, हेही आपल्याला माहिती हवे. त्यापुढील वृत्त आहे की, भारतही विविध अत्याधुनिक शस्त्रांचा तेथे वापर कसा करायचा ? याचा अभ्यास करत आहे. भारताची मथुरास्थित ‘१-कॉर्प्स’ (‘स्ट्राईक कॉर्प्स’) सैन्याची आधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज तुकडी आधी पाकिस्तानच्या विरोधात होती. आता तिला चीनच्या विरोधात उभे करण्यात आले आहे, म्हणजेच आता भारताचे सैन्य चीनच्या विरोधात अधिक आक्रमक झाले आहे. भारताकडे अशा काही ‘स्ट्राईक कॉर्प्स’, म्हणजे आक्रमक कॉर्प्स होत्या, ज्या लढाई झाल्यास पाकिस्तानच्या आत जाऊन थेट भिडण्याचे काम करू शकत होत्या. त्या ३ ‘स्ट्राईक कॉर्प्स’पैकी एक ‘स्ट्राईक-१ कॉर्प्स’ चीनच्या विरोधात उभी केली आहे. तिचा लडाखमध्ये आक्रमक कारवाईसाठी वापर करण्यात येणार आहे. दुसरी ‘स्ट्राईक कॉर्प्स’ अरुणाचल प्रदेशात चीनच्या विरोधात वापरली जाईल. याचा अर्थ भारताने आक्रमक सैन्य सिद्ध ठेवले आहे.

३. तिबेटींना पाठिंबा असल्याचे दर्शवण्यासाठी भारताने त्यांचे धर्मगुरु दलाई लामा यांना लडाखमध्ये आणणे

एवढेच नाही, तर तिबेटचे धर्मगुरु दलाई लामा हे लडाखमध्ये आले आहेत. ते पुढील १ मास तेथे रहाणार आहेत. ते योगायोगाने आले नसून त्यांना आणण्यात आले आहे. ‘तुम्हाला आम्हीही त्रास देऊ शकतो’, हे चीनला सांगण्यासाठी भारताने ती खेळी केली आहे. यातून ‘तिबेटींना जे आध्यात्मिक स्वातंत्र्य हवे आहे, त्याला आमचा संपूर्ण पाठिंबा आहे’, हा मोठा संदेश भारत चीनला देत आहे.

भारत पुढच्या काळात याहून मोठा संदेश देण्याच्या सिद्धतेत आहे. ‘जी २०’ (जगातील सर्वांत मोठे देश) देशांची एक परिषद भारतात होणार आहे. भारताने ही परिषद लडाखमध्ये करण्याचे ठरवले आहे. विशेष म्हणजे यात अमेरिकेसह चीनचाही समावेश आहे. यातून भारत चीनला एक संदेश देऊ इच्छितो की, भारतालाही तेथे आक्रमक कारवाया करायच्या आहेत आणि भारतीय सैन्य चीनच्या विरुद्ध संरक्षण करण्यासाठी सिद्ध आहे. चीनच्या प्रत्येक कारवाईला भारत प्रत्युत्तर देत आहे. त्यामुळे आपण चीनची कुठलीही दादागिरी सहन करणार नाही. चीनचे हे मानसिक युद्ध पुष्कळ दिवस चालणार आहे. त्यामुळे भारतालाही सदैव सिद्ध रहावे लागेल.’

– (निवृत्त) ब्रिगेडियर हेमंत महाजन, पुणे