प्रयागराज (उत्तरप्रदेश) येथील ५ शाळांतील २०० विद्यार्थी एकमेकांवर फेकतात गावठी बाँब  !

१० विद्यार्थी पोलिसांच्या कह्यात !

प्रयागराज (उत्तरप्रदेश) – येथील ५ प्रसिद्ध शाळांतील २०० विद्यार्थ्यांनी त्यांच्या टोळ्या बनवल्या आहेत. या टोळ्या एकमेकांवर गावठी बाँब फेकून स्फोट घडवून आणत आहेत. गेल्या काही दिवसांत त्यांनी अनेक स्फोट घडवून आणले आहेत. ‘तांडव’, ‘माया’ आणि ‘अमर’ नावाच्या या टोळ्या आहेत. पोलिसांनी १० विद्यार्थ्यांना कह्यात घेतले होते. १५, १६ आणि २२ जुलै या दिवशी वेगवेगळ्या ठिकाणी घडलेल्या गावठी बाँबच्या स्फोटांत ते सहभागी होते. पोलिसांनी त्यांच्या कह्यातून अनेक दुचाकी गाड्या, १२ भ्रमणभाष संच आणि काही गावठी बाँब जप्त केले. जे या टोळ्यांत सहभागी असू शकतात, अशा विद्यार्थ्यांची ओळख पटवण्याचे काम पोलीस करत आहेत. गावठी बाँबच्या स्फोटांत गुन्हेगारी टोळ्या सहभागी असाव्यात, असा संशय पोलिसांना होता; पण यामागे विद्यार्थ्यांचा हात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले.

१. पोलीस वरिष्ठ पोलीस अधीक्षक शैलेश पांडे यांनी सांगितले की, हे विद्यार्थी परस्परांवर आक्रमण करत होते आणि गावठी बाँबही फेकत होते. आरोपी दुचाकी वाहनांवर फिरत असत आणि नेहमी चेहरा झाकून घेत असत.

२. या विद्यार्थ्यांनी टोळीसाठी सामाजिक माध्यमांवर स्वतःचे खातेही बनवले आहे. त्यावर ते दुसर्‍या टोळीवर वर्चस्व दाखवण्यासाठी बाँबस्फोटांची छायाचित्रे पोस्ट करतात.

संपादकीय भूमिका

विद्यार्थी गावठी बाँब बनवेपर्यंत याची कुणालाच माहिती मिळू नये, हे पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणेचे अपयश आहे !