जन्मदात्या वडिलांच्या मृत्यूनंतर आईला मुलाचे आडनाव पालटण्याचा अधिकार ! – सर्वोच्च न्यायालय

नवी देहली – जन्मदात्या पित्याच्या मृत्यूनंतर आई हीच मुलाची कायदेशीर आणि नैसर्गिक पालक असते. तिला स्वत:च्या मुलाचे आडनाव ठरवण्याचा पूर्ण अधिकार आहे. जर आईने दुसरा विवाह केला, तर आई त्या मुलाला दुसर्‍या पतीचे आडनावही देऊ शकते, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणाच्या सुनावणीच्या वेळी दिला. यामुळे आंध्रप्रदेश उच्च न्यायालयाने आडनावाच्या संदर्भात दिलेला निर्णय रहित करण्यात आला आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयात महिलेला निर्देश देण्यात आले होते की, तिने मुलाच्या कागदपत्रांमध्ये तिच्या नव्या पतीचे नाव ‘सावत्र पिता’ म्हणून दाखवावे.

सर्वोच्च न्यायालयाने पुढे म्हटले की, आडनाव हे केवळ वंशाचे सूचक नाही आणि ते केवळ इतिहास अथवा संस्कृती यांच्या संदर्भात आहे, असेही समजू नये. कागदपत्रांमध्ये ‘सावत्र पिता’ म्हणून आईच्या दुसर्‍या पतीचा समावेश करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने ‘क्रूरता’ आणि ‘अवास्तव’ असल्याचे म्हटले. याने मुलाच्या मानसिक आरोग्यावर आणि आत्मसन्मानावर परिणाम होईल, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.