पोलिसांना घराची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

मुंबई – ‘मुंबई महानगर आणि ग्रामीण महाराष्ट्र अशा सर्वच भागांतील पोलिसांना पुरेशा संख्येने घरे उपलब्ध होतील, यासाठी तात्काळ अन् दीर्घ टप्प्याचे नियोजन करा. पोलिसांना घरांची चिंता भासणार नाही, असे नियोजन करा’, असा आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रशासनाला दिला. पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्याविषयी २७ जुलै या दिवशी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांनी संबंधित प्रशासकीय अधिकार्‍यांसमवेत बैठक घेतली. या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, ‘‘पोलिसांच्या घरांची परिस्थिती पालटण्याचा आमचा निर्धार आहे. आपले पोलीस वारा, पाऊस, सण-उत्सव, कोरोना यांसारख्या आव्हानात्मक परिस्थितीत आपल्यासाठी उभे असतात. त्या वेळी त्यांना घराची चिंता वाटायला नको. त्यांना घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी विविध पर्याय आणि योजना यांचा विचार करा. म्हाडा, सिडको, झोपडपट्टी विकास योजना, क्लस्टर योजना यांसह सर्वसमावेशक घरकुल योजना, परवडणारी घरे, तसेच औद्योगिक विकास महामंडळ आणि खासगी विकासक यांच्या माध्यमातून पोलिसांसाठी अधिकाधिक घरे उपलब्ध व्हावीत, यासाठी आराखडा सिद्ध करा. पोलिसांसाठी घरे बांधतांना अत्याधुनिक तंत्रज्ञान, दर्जेदार सामुग्रीचा उपयोग करण्यात यावा.’’