चोडण बेटावरील श्री देवकीकृष्ण मंदिरापासून गोव्यातील उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुनर्बांधणी चालू करावी ! – चोडणवासियांची मागणी

पणजी – मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांची पुर्नबांधणी करण्याच्या घोषणेचे समाजातील सर्व स्तरांतून स्वागत होत आहे. याचाच एक भाग म्हणजे चोडण बेटावरील (तत्कालीन चुडामणी बेट) पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेले श्री देवकीकृष्ण मंदिर तेथील मूळ स्थानावर पुन्हा उभारून पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणी योजनेचा प्रारंभ करावा, अशी मागणी तेथील ग्रामस्थांकडून होत आहे. श्री देवकीकृष्ण मंदिर होते त्या जागेत नियमितपणे उदबत्ती आणि फुले वहाणारे नागरिक महेश आमोणकर यांनी ‘हे मंदिर पुन्हा नव्याने उभारावे’, असे म्हटले आहे. त्याला सर्वश्री शांताकर गाड, शिवराम (बाबू) भोमकर, शामसुंदर चोडणकर या ज्येष्ठ नागरिकांबरोबरच सर्वश्री पांडुरंग चोडणकर, मिलिंद महाले, गजानंद चोडणकर, दयानंद (बाबलो) वळवईकर, दिलीप दळवी, अर्जुन वळवईकर इत्यादी इतर नागरिकांचा पाठिंबा आहे. मंदिराची मूळ जागा हीच असून त्या ठिकाणी मंदिर उभारून सरकारने इतिहासाला उजाळा देणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.

श्री देवकीकृष्ण संस्थान श्रीक्षेत्र माशेल गोवा समग्र इतिहास आणि माहिती या पुस्तकातील माहितीनुसार सुमारे ५०० वर्षांपूवी चोडण (चुडामणी) बेटावर श्री गणेश, श्री रवळनाथ, श्री बाक्कादेवी, श्री मल्लिनाथ, श्री भगवती, श्री देवकीकृष्ण, संतपुरुष, बारा जण, श्री नारायण, श्री कांतेश्वर, श्री चंडेश्वर, दाडसांखळ इत्यादी देवतांची मंदिरे होती. पोर्तुगिजांनी हिंदूंचे ख्रिस्ती धर्मात धर्मांतर करण्याच्या काळात या सर्व मंदिरांचा विध्वंस केला. चोडण बेटावरील मंदिरांचा विध्वंस होणार याचा सुगावा लागताच ख्रिस्ताब्द १५३० ते १५४० या काळात श्री देवकीकृष्ण मंदिराचे स्थलांतर मये येथे करण्यात आले, अशी नोंद कागदोपत्री आढळून येते. तसेच ख्रिस्ताब्द १५४० ते ख्रिस्ताब्द १५६७ या कालावधीत हे दैवत मये गावातून माशेल येथे स्थलांतरित झाल्याची नोंद आढळते. चोडण बेटावरील सर्व नागरिकांचे श्री देवकीकृष्ण हे प्रमुख दैवत होते आणि आजही आहे. चोडण येथील वयाची शंभरी ओेलांडलेले ज्येष्ठ नागरिक एकनाथ कवठणकर यांनी या गोष्टीला दुजोरा दिला आहे.