अमेरिकेमध्ये डॉक्टरांच्या तुटवड्यामुळे नवे संकट !

वॉशिंग्टन (अमेरिका) – कोरोनाच्या महामारीनंतर आता अमेरिकेमध्ये डॉक्टरांच्या अपुर्‍या संख्येमुळे नवे संकट निर्माण झाले आहे. येथे वैद्यकीय सल्ला घेण्यासाठीही रुग्णांना अनेक मास आधी नावनोंदणी करावी लागत आहे. ‘असोसिएशन ऑफ मेडिकल कॉलेज’ने वर्ष २०२० पर्यंत प्रकाशित केलेल्या सूचीतील आकडेवारीनुसार वर्ष २०३३ पर्यंत अमेरिकेत ५४ सहस्र १०० ते १ लाख ३९ सहस्र डॉक्टरांचा तुटवडा भासू शकेल. हा तुटवडा प्राथमिक, तसेच गंभीर उपचार पद्धतींच्या विभागातही भासवू लागला आहे.

१. सप्टेंबर २०२१ मध्ये प्रकाशित ‘कॅन्सर फॅमिली फाऊंडेशन’च्या एका अहवालानुसार अमेरिकेत प्राथमिक उपचारही मिळत नसलेल्या भागांत रहाणार्‍यांची संख्या ८ कोटी ३७ लाख आहे. ही समस्या दूर करण्यासाठी १४ सहस्र ८०० हून अधिक डॉक्टरांची आवश्यकता भासत आहे.

२. अन्य एका पहाणीनुसार वर्ष २०२२ मध्ये अनुमाने ३८ टक्के डॉक्टर निवृत्त होत आहेत. तरीही डॉक्टरांची अपुरी संख्या दूर करण्याचे प्रयत्न अमेरिकी सरकारने केलेले नाहीत. डॉक्टरांची कमतरता लक्षात घेऊन सरकारने डॉक्टरांना कर्जात दिलासा द्यायला हवा.

३. ‘जनरल इंटर्नल मेडिसिन’च्या आकडेवारीनुसार अमेरिकेतील एकूण डॉक्टरांमध्ये केवळ ५.४ टक्के कृष्णवर्णीय आहेत. त्यात २.६ टक्के पुरुष, तर २.८ टक्के महिला आहेत.