कांगो देशात ‘संयुक्त राष्ट्र शांती सैन्या’तील २ भारतीय सैनिकांची हत्या !

परराष्ट्रमंत्र्यांकडून दु:ख व्यक्त !

भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे कोंगो देशात मारले गेलेले दोन सैनिक

नवी देहली – आफ्रिकी देश कांगोमधील बुटेम्बो शहरात २६ जुलै या दिवशी आंदोलनकर्त्यांनी ‘संयुक्त राष्ट्र शांती सैन्या’च्या विरोधात केलेल्या संघर्षात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचे २ सैनिक मारले गेले. यावर परराष्ट्रमंत्री एस्.जयशंकर दु:ख व्यक्त केले आहे. ते म्हणाले की, लोकशाही प्रजासत्ताक कांगोमध्ये सीमा सुरक्षा दलाच्या दोन शूर भारतीय सैनिकांच्या मृत्यूविषयी मला तीव्र दु:ख झाले. ते ‘मोनुस्को’चा (लोकशाही प्रजासत्ताक कांगो येथील संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमेचा) भाग होते. संबंधित दोषींना कठोर शासन झाले पाहिजे.

कांगो देशातील हिंसाचार

संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनीही ‘भारतासाठी हा पुष्कळ मोठा धक्का आहे’, असे म्हटले आहे. कांगो हा देश गेल्या अनेक वर्षांपासून गृहयुद्धाला सामोरा जात आहे. सुंयक्त राष्ट्रांचे शांती सैन्य वर्ष १९९९ पासून तेथे शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्नरत आहे. यामध्ये विविध देशांच्या २० सहस्र शांती सैनिकांचा समावेश असून त्यांतील ४ सहस्र सैनिक हे एकट्या भारताचे आहेत.