‘मंकीपॉक्स’ आजार : लक्षणे, उपाय आणि जागरूक रहाण्याची आवश्यकता !

गेल्या मासापर्यंत ‘मंकीपॉक्स’ या आजाराचे नाव आफ्रिकेबाहेर कुणालाही ठाऊक नव्हते. भारतात आतापर्यंत ४ रुग्ण सापडले आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार मंकीपॉक्सचे आतापर्यंत विविध देशांमध्ये १५ सहस्र ७३४ रुग्ण सापडले आहेत. ही संख्या आणखी वाढू शकते. आता सर्व देश या आजाराविषयी जागृत झाले आहेत. या आजाराचा प्रसार थांबवण्यासाठी प्रत्येक संशयित नोंदवला आणि पडताळला जात आहे. गेली अडीच वर्षे कोरोना महामारीशी लढल्यानंतर हा नवा आजार सर्वांच्या चिंतेमध्ये भर घालत आहे.

‘मंकीपॉक्स’ मुळे शरिरावर फोडांसारखे दिसणारे पुरळ 

१. मंकीपॉक्स आजाराचा प्रारंभ आणि त्याचा होत असलेला ‘जागतिक उद्रेक’ 

मंकीपॉक्स हा काही नवा आजार नाही. वर्ष १९५८ मध्ये सर्वप्रथम माकडांमध्ये हा आजार दिसून आल्याने याला ‘मंकीपॉक्स’ असे नाव देण्यात आले. हा आजार विषाणूजन्य आहे. याचा विषाणू ‘ओर्थोपॉक्स’ म्हणजे देवीच्या विषाणूच्या प्रकारचा आहे. (देवी रोग हा एक रोग आहे. हा रोग ‘रिओला’ नावाच्या विषाणूंमुळे होतो. या रोगामुळे मज्जासंस्थेला संसर्ग होतो. या रोगाची लक्षणे म्हणजे ताप येतो आणि याचा संसर्ग होऊन नंतर ३ ते ४ दिवसांत अंगावर पुरळ येतात) यापूर्वी गायींना होणार्‍या ‘काऊपॉक्स’ या आजारामुळेच देवीच्या आजारावर लस शोधण्यात यश आले होते. हा आजार देवीच्या आजारासारखा आहे; मात्र त्याहून सौम्य आहे आणि मृत्यूचा धोकाही देवीच्या आजाराहून अत्यल्प म्हणजे ३ ते ६ टक्के इतका आहे.

वर्ष १९७० मध्ये ‘डॉमिनिकन रिपब्लिक ऑफ काँगो’ या आफ्रिकेतील देशामध्ये सर्वप्रथम मंकीपॉक्सचा मानवी रुग्ण आढळून आला होता. तेव्हापासून या आजाराचे रुग्ण आफ्रिकेतील विविध देशांमध्ये आढळून येतात. त्या देशांमध्ये या आजारामुळे अधूनमधून रुग्णसंख्या वाढून उद्रेक होत असतात. नायजेरियामध्ये वर्ष २०१७ पासून उद्रेक चालू होता. इंग्लंडमध्ये ७ मे २०२२ या दिवशी सापडलेला पहिला रुग्ण हा नायजेरियाचा प्रवासी होता; मात्र त्यानंतर जगभरात सापडलेले सर्वच रुग्ण हे प्रवासी रुग्ण नाहीत. गेला काही काळ हा आजार विविध देशांमध्ये पसरत असल्याचे हे लक्षण आहे आणि म्हणून याला ‘जागतिक साथ’, असे न म्हणता सध्या ‘जागतिक उद्रेक’, असे म्हटले जात आहे.

२. मंकीपॉक्सचा संसर्ग आणि त्यावरील उपाय 

मंकीपॉक्सचा विषाणू हा ‘आर्.एन्.ए.’ (रायबोन्यूक्लिइक ॲसिड – मानवी शरिरातील प्रत्येक पेशीमध्ये असलेले एक प्रकारचे आम्ल) विषाणू आहे. हा विषाणू मानवी शरिराबाहेर अधिक काळापर्यंत टिकू शकतो. याच्या संसर्गाचे विविध मार्ग आहेत; मात्र मुख्यतः अधिक काळासाठी नजीकचा रुग्णसंपर्क हे मुख्य कारण आहे. रुग्णाच्या शरिरातील स्राव, फोडांमधील स्राव, रुग्णाचे कपडे वा अंथरुणे, फोडाच्या खपल्या, काही प्रमाणामध्ये खोकणे आणि शिंकणे याद्वारे विषाणू संपर्कातील लोकांपर्यंत पोचतो. असे असले, तरी याचा संसर्ग काही मिनिटांत न होता त्यासाठी अधिक कालावधीसाठी काळजी घेणे आवश्यक आहे, म्हणजेच रुग्णाची काळजी घेणारी व्यक्ती आणि वैद्यकीय कर्मचारी यांनी संसर्ग टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेणे आवश्यक आहे. रुग्णसेवा करतांना मास्क वापरणे, हातांची वारंवार स्वच्छता, रुग्णांना हाताळतांना ‘ग्लोव्हज’ वापरणे, रुग्णाला इतरांपासून वेगळे ठेवणे या उपायांनी सुरक्षित रहाता येते.

संसर्ग झाला असल्यास साधारण ५ ते २१ दिवसांनी लक्षणे दिसू लागतात. त्यामुळे संपर्कातील व्यक्तींना ३ आठवडे अलगीकरण करणे / निरीक्षणाखाली ठेवणे, हे कोणत्याही देशातील उद्रेक थांबवण्यासाठी अत्यावश्यक आहे आणि यासाठी संपर्क साखळी शोधणे, हेही पुष्कळ महत्त्वाचे आहे. यासाठी जनतेचे, तसेच वैद्यकीय व्यवसायिक यांचे सहकार्य आवश्यक आहे.

३. आजाराची लक्षणे 

मंकीपॉक्सची लक्षणे थोडी कांजण्यांसारखी आणि थोडी फ्लू किंवा कोरोनासारखी वाटतात; मात्र दोन्हीमध्ये भेद आहे. संसर्ग झाल्यानंतर आजाराचा प्रारंभ तापाने होतो. त्यासह डोकेदुखी, स्नायूदुखी, पाठदुखी, तसेच अत्यधिक थकवा जाणवू शकतो; मात्र काख, जांघ, गळा यांच्याजवळील लसिका ग्रंथी सुजतात (Lymphadenopathy). हे लक्षण असल्यास, तसेच ताप आल्यानंतर साधारण ३ दिवसांनी शरिरावर विशिष्ट प्रकारचे पुरळ वा फोड आल्यास मंकीपॉक्स या आजारासाठीची तपासणी करणे आवश्यक आहे.

मंकीपॉक्सचा पुरळ उठल्यानंतर रुग्णापासून संसर्ग पसरण्यास प्रारंभ होतो. मंकीपॉक्सचे फोड देवीच्या आजाराहून सौम्य; मात्र कांजण्या (वाराफोड) आजारापेक्षा अधिक तीव्रतेचे असतात. या आजाराचा प्रारंभ होतांना चेहरा, हात आणि पावले यांवर अधिक फोड असतात अन् शरिरावर अल्प असतात. (कांजण्यांमध्ये मात्र शरिरावर अधिक फोड येतात.) हे फोड आधी लालसर पुरळ स्वरूपात येतात, नंतर पाण्याने भरलेले फोड सिद्ध होतात, जे नंतर पांढरे अथवा पिवळे होऊ शकतात. साधारण २ ते ४ आठवड्यांनंतर हे फोड वाळून त्यावरील खपली पडते. सर्व खपल्या पडल्यानंतर रुग्णापासून आजार पुढे पसरत नाही.

४. मंकीपॉक्सचा विषाणू देवीच्या विषाणूशी मिळता जुळता

मंकीपॉक्सचा विषाणू देवीच्या विषाणूच्या जवळचा असल्याने त्यावरील लस मंकीपॉक्सपासून ८५ टक्क्यांपर्यंत सुरक्षा देऊ शकते; मात्र देवीचा आजार वर्ष १९८० मध्येच जगभरातून नाहीसा झाल्यानंतर त्यावरचे लसीकरण बंद करण्यात आले. वर्ष १९८० नंतर जन्मलेल्या लोकांना देवीची लस मिळाली नसल्याने त्यांना मंकीपॉक्स आजाराचा धोका अधिक आहे. ४२ वर्षांवरील व्यक्तींना देवीची लस मिळाली असली, तरीही तिचा परिणाम न्यून झाला असण्याची शक्यता आहे. त्यामुळे रुग्णाशी संपर्क आल्यास कुटुंबातील सर्वांनीच काळजी घ्यायला हवी.

५. मंकीपॉक्सच्या विरोधात विविध देशांकडून केले जाणारे उपाय

जैविक युद्धाच्या भीतीपोटी अमेरिकेसारख्या देशांनी देवीच्या लसींचा साठा उपलब्ध ठेवलेला आहे, तसेच मंकीपॉक्सविरुद्धही एका लसीला तिथे मान्यता आहे. त्यामुळे अतीजोखमीच्या आणि संपर्कातील व्यक्तींना लस देण्याचा निर्णय भविष्यामध्ये घेतला जाऊ शकतो; मात्र ‘कोरोनाप्रमाणे सार्वत्रिक लसीकरण करण्याची वेळ येणार नाही’, असे तज्ञांचे मत आहे. काही देश विलगीकरण तंत्राचा प्रभावी वापर करत आहेत, उदा. बेल्जियममध्ये आजाराचे निश्चित निदान झाल्यावर रुग्णाला सर्व जखमा भरेपर्यंत विलगीकरण करण्यासह संपर्क टाळण्यास सांगितले जात आहे. ब्रिटनमध्ये रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तींना २१ दिवसांसाठी स्वयं अलगीकरण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

६. मंकीपॉक्स आजारावर उपाय

या आजारावर मुक्तपणे प्रभावी औषध उपलब्ध नाही. देवीच्या आजारावरील औषध यावर चालते; पण ते महाग असून सर्वत्र उपलब्ध नाही. हा आजार कांजण्यांप्रमाणे २ ते ४ आठवड्यांमध्ये बरा होणारा आहे. त्यामुळे या काळामध्ये लक्षणांनुसार उपचार, विश्रांती, पाण्याचे प्रमाण योग्य राखणे, स्वच्छता ठेवणे जेणेकरून विषाणू संसर्ग होणार नाही, याची काळजी घेणे; संसर्ग झाल्यास प्रतिजैविके घेणे, हे उपाय पुरेसे ठरतात. फोड उठल्यावर सहसा ताप न्यून होतो; मात्र फोड बरे झाल्यानंतर त्याच्या खुणा मात्र शरिरावर राहू शकतात. हे फोड गुप्तांगावर, तोंडामध्ये तसेच डोळ्यामध्येही येऊ शकतात आणि त्यामुळे अधिक त्रास होऊ शकतो. डोळ्यामध्ये फोड आल्यास दृष्टी जाण्याचा धोकाही असतो.

७. रोगप्रतिकारशक्ती न्यून असणारे आणि गरोदर महिला यांच्यासाठी धोकादायक

हा आजार लहान मुलांमध्ये अधिक गंभीर असू शकतो. त्यामुळे ताप आणि पुरळ दिसून आल्यास आजार अंगावर न काढता डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. ज्यांच्यामध्ये कोणत्याही कारणाने ‘इम्युनिटी’ (रोगप्रतिकारशक्ती) न्यून आहे, उदा. एड्स, स्टिरॉईडचा वापर करणारे, इतर गंभीर आजारग्रस्त व्यक्ती यांनी रुग्णांच्या संपर्कात न येण्याची काळजी घ्यावी, तसेच आजार झाल्यास वैद्यकीय सल्ल्यानुसार काळजी घ्यावी. गरोदर महिलांना या आजारापासून सुरक्षित ठेवायला हवे; कारण यामुळे गर्भपाताचा आणि नवजात शिशूला जन्मतः आजार होण्याचा धोका वाढतो.

८. आजाराचा विविध देशांमध्ये पसरण्याच्या कारणांचा शोध घेणे चालू

सध्या आढळत असलेल्या नव्या विषाणूमध्ये उत्परिवर्तन आढळून आले आहे. ‘या पालटांमुळे विषाणूला मानवी प्रसाराची सुलभता प्राप्त झाली असावी’, असे शास्त्रज्ञांचे अनुमान आहे. ‘कोरोनामुळे सर्वांच्या रोगप्रतिकारक शक्तीवर अनिष्ट परिणाम झालेले असल्याने या आजाराला योग्य प्रतिसाद देता येत नसावा’, असेही एक अनुमान आहे. इतक्या वर्षांनंतर हा आजार आफ्रिकेबाहेरील विविध देशांमध्ये पसरण्याच्या कारणांचा शोध चालू आहे. त्यामुळे वेळोवेळी देण्यात येणार्‍या सूचनांचे पालन करणे, हे देशाच्या सुरक्षेसाठी महत्त्वाचे आहे.

९. मंकीपॉक्स आजार देशामध्ये विशिष्ट ठिकाणचा होऊ न देणे महत्त्वाचे !

अमेरिकेमध्ये वर्ष २००३ मध्ये या आजाराचा उद्रेक झाला होता. त्या वेळी ‘प्रैरि’ (Prairie) जातीच्या कुत्र्यांमध्ये याचा संसर्ग पसरल्याने त्यांच्यापासून मानवी संसर्ग झाला होता. हा मुख्यतः प्राणिजन्य आजार असल्याने माकडे, कुत्रा, तसेच लहान प्राणी म्हणजेच उंदीर, घुशी, खारी अशा प्राण्यांमध्येही संसर्ग पसरण्याची शक्यता आहे. एखाद्या देशामध्ये असे घडल्यास तो विशिष्ट ठिकाणी असलेल्या लोकांना होणारा आजार (एंडेमाईक – endemic) होऊ शकेल आणि मग त्याचे नियंत्रण थोडे अवघड होऊ शकेल. मंकीपॉक्सचे देवीप्रमाणे उच्चाटन होणे सहज शक्य नाही. हा आजार देशामध्ये विशिष्ट ठिकाणी होऊ न देणे महत्त्वाचे आहे.

१०. संसर्ग टाळण्यासाठी योग्य कृती केल्यास भारताला सुरक्षित ठेवणे शक्य !

सध्या प्रत्येक संशयित रुग्ण ओळखणे, हे अत्यावश्यक आहे. ताप आणि पुरळ असा आजार अंगावर न काढता वैद्यकीय यंत्रणेला याविषयी माहिती द्या आणि इतरांशी संपर्क टाळा. हा आजार सर्व वयोगटांमध्ये होऊ शकतो. परदेशी प्रवास केलेल्या व्यक्तींनी विशेष काळजी घ्यावी. २१ दिवस स्वतःवर काळजीपूर्वक लक्ष ठेवा. सर्व डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांची तपासणी करतांना ‘पुरळ आहेत का ? लसिका ग्रंथींची वाढ झालेली आहे का ?’, याची तपासणी अवश्य करावी, तसेच प्रत्येक संशयित रुग्णाची नोंद सार्वजनिक आरोग्य विभागाकडे करावी. या आजारावरही एक चाचणी विकसित करण्यात आली आहे. या आजाराविषयी भेदाभेद आणि कलंकित भावना उत्पन्न होऊ न देता, योग्य ती काळजी घेतल्यास, तसेच चुकीच्या माहितीला बळी न पडता आजार अन् त्याचा संसर्ग टाळण्यासाठी योग्य कृती केल्यास भारताला सुरक्षित ठेवणे शक्य आहे. आवश्यकता आहे ती शास्त्रीय दृष्टीकोन आणि सहकार्य यांची ! आपण सर्वांनी मंकीपॉक्सपासून सुरक्षेसाठी जागरूक राहून त्याला दूर ठेवूया !

– डॉ. प्रिया प्रभु-देशपांडे, सहयोगी प्राध्यापिका, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, मिरज.

(साभार : साप्ताहिक ‘विवेक’)