मुलांना आरोग्यदायी आणि संस्कारक्षम घडवा !

सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांचे आवाहन

सोलापूर, २६ जुलै (वार्ता.) – जिल्हा परिषदेने मुलांसाठीचा दशसूत्री कार्यक्रम घोषित केला आहे. मुलांचे आरोग्य आणि शिक्षण यांवर भर देऊन आरोग्यदायी, संस्कारक्षम पिढी घडवण्याचे काम करण्याचे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी केले. जिल्हा रुग्णालयात ‘राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमां’तर्गत आढावा बैठकीत ते बोलत होते. या वेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. श्रीकांत कुलकर्णी, कार्यक्रम समन्वयक भगवान भुसारी उपस्थित होते.

या वेळी दिलीप स्वामी यांनी सांगितले की,

१. ‘दशसूत्री’ मुलांच्या भवितव्यासाठी आवश्यक आहे. १० सहस्र शिक्षकांना ‘दशसूत्री’ कार्यक्रम समजावून देण्यात येत आहे. सध्या ‘जंकफूड’मुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. त्यामुळे पालकांचाही दृष्टीकोन पालटण्याचा प्रयत्न आहे. स्वच्छता, हात धुणे अशा चांगल्या सवयी लागण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येत आहे. आरोग्य आणि शिक्षण सुधारले, तर ग्रामीण भागाचा स्वर्ग होण्यास साहाय्य होईल.

२. सध्या मुलांना माहिती तंत्रज्ञानाची पुष्कळ आवड असल्याने त्यांना त्याविषयी माहिती द्यावी. स्पर्धाक्षम विद्यार्थी होण्यासाठी प्रयत्न करण्याविषयी शिक्षकांना संदेश दिला आहे. त्यांना आई, वडील, वडीलधारे, गुरु यांचे महत्त्व पटवून द्यायला हवे. जिल्हा परिषद, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य, खासगी संस्थांद्वारे मुलांचे सक्षमीकरण करण्यात यावे