बांगलादेश आणि भारत येथील हिंदूंवरील अत्याचार जागतिक स्तरावर मांडले !

नेदरलँड्सचे खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांना पाठवले प्रश्‍न !

नेदरलँडचे खासदार गिर्ट विल्डर्स

अ‍ॅमस्टरडॅम (नेदरलँड्स) – नेदरलँड्स येथील ‘पार्टी फॉर फ्रीडम’ या राजकीय पक्षाचे संस्थापक आणि खासदार गीर्ट विल्डर्स यांनी विविध देशांच्या परराष्ट्र, कायदा आणि सुरक्षा यांच्याशी संबंधित मंत्र्यांना पत्र लिहून बांगलादेश अन् भारत येथे हिंदूंवर होणार्‍या इस्लामी अत्याचारांविषयी १३ प्रश्‍न विचारले आहेत. विल्डर्स यांनी हे प्रश्‍न नेमक्या कोणकोणत्या देशांच्या मंत्र्यांना पाठवले आहेत, हे ‘सनातन प्रभात’च्या प्रतिनिधीने त्यांना विचारले असता त्याचे उत्तर आतापर्यंत मिळू शकलेले नाही.

या पत्रातील प्रमुख प्रश्‍न पुढीलप्रमाणे आहेत –

१. बांगलादेशातील हिंदूंवर भयावह हिंसाचार होत असल्याचे आपल्याला ठाऊक आहे का ? याविषयी तुमचे काय मत आहे ?

२. हे अत्याचार मुसलमानांकडून केले जात आहेत, हे तुम्हाला ठाऊक आहे का ? यावर आपले मत काय ?

३. तुम्हाला याची कल्पना आहे का की, हिंदूंची घरे, धार्मिक स्थळे, दुकाने यांची जाळपोळ केली जात आहे ? यावर आपण आपले मत व्यक्त कराल का ?

४. गेल्या काही वर्षांमध्ये मुसलमानबहुल बांगलादेशमध्ये अल्पसंख्य हिंदूंवरील अत्याचार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत, याविषयी आपल्याला काय म्हणायचे आहे ?

५. तुम्हाला हे मान्य आहे का की, अत्याचारांच्या या घटनांना पाश्‍चात्त्य जगामध्ये विशेष प्रसिद्धी दिली जात नाही ? यामागे काय कारण असावे, असे आपल्याला वाटते ? ही स्थिती पालटण्यास तुम्ही सिद्ध आहात का ? जर नाही, तर का नाही ?

६. तुम्हाला हे मान्य आहे का की, मुसलमानांवर होणार्‍या अत्याचारांच्या घटनांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी दिली जाते; परंतु मुसलमानांकडून करण्यात येणार्‍या अत्याचारांकडे कानाडोळा केला जातो ? जर असे आहे, तर यावर आपणाकडून काही स्पष्टीकरण देण्यात येईल का ? जर नाही, तर का नाही ?

७. तुम्ही बांगलादेश, भारत, तसेच अन्य देशांतील हिंदूंना उघडपणे समर्थन देऊन त्या पार्श्‍वभूमीवर संबंधित देशांच्या सरकारांना संपर्क करण्यास सिद्ध आहात का ? जर नाही, तर का नाही ?

८. मुसलमानांकडून हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांचा तुम्ही उघडपणे निषेध करणार का ?

या प्रश्‍नांखेरीज विल्डर्स यांनी नूपुर शर्मा प्रकरण आणि त्यानुषंगाने चालू असलेल्या हिंसात्मक घडामोडींवरही प्रश्‍न विचारले आहेत.

संपादकीय भूमिका

जे भारतातील हिंदु राजकीय नेत्यांनी करणे अपेक्षित आहेे, ते सातासमुद्रापलीकडे असलेला एक ख्रिस्ती खासदार करतो, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंच्या नेत्यांच्या अशा निष्क्रीयतेमुळे हिंदूंवरील अत्याचार कधीतरी थांबतील का ?