छत्तीसगड सरकार शेणानंतर आता गोमूत्र खरेदी करणार !

शेणाद्वारे खत, तर गोमूत्राद्वारे कीटकनाशक बनवण्यात येणार !

रायपूर (छत्तीसगड) – छत्तीसगडमधील काँग्रेस सरकार राज्यात गोमूत्र खरेदीच्या योजनेला २८ जुलैपासून प्रारंभ करणार आहे. या योजनेला मंत्रीमंडळाने संमती दिली आहे.  सरकार ४ रुपये लिटर या दराने गोमूत्र विकत घेणार आहे. यापूर्वीच सरकारने २ रुपये किलो दराने शेण विकत घेण्याची ‘गोधन न्याय योजना’ प्रारंभ केलेली आहे. गोमूत्र खरेदी करणारे छत्तीसगड हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. शेण खरेदी करणारेही ते पहिले राज्य ठरले आहे. ‘गोधन न्याय योजने’द्वारे खरेदी केलेल्या शेणाचा वापर खत बनवण्यासाठी, तर गोमूत्राचा वापर कीटकनाशक बनवण्यासाठी केला जाणार आहे.

राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी सांगितले की, या योजनेमुळे राज्यातील शेतकरी आणि पशूपालन करणारे यांच्या उत्पन्नात वाढ होणार आहे, तसेच रस्त्यावर पशूंना मोकळे सोडण्याच्या घटनाही थांबतील; कारण लोक त्यांना त्यांच्या गोठ्यात बांधून ठेवतील. यासह ग्रामीण अर्थव्यवस्थेतही सुधारणा होईल.