इंदूर (मध्यप्रदेश) – ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक आणि पारमार्थिक सेवा ट्रस्ट, इंदूर’ यांच्या वतीने १२ आणि १३ जुलै या दिवशी येथील नवनीत गार्डन, विज्ञाननगर येथे श्रीमद् सद्गुरु अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचा गुरुपूजनाचा कार्यक्रम पार पडला, तर ११ जुलै या दिवशी भक्तवात्सल्याश्रम येथे ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सव’ भावपूर्ण वातावणात साजरा झाला. कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे भक्तांना गुरुपौर्णिमा महोत्सवाला उपस्थित रहाता आले नव्हते. त्यामुळे यावर्षी सर्व भक्तांनी मोठ्या उत्साहात या कार्यक्रमात सहभाग घेतला. सर्व भक्तगण भक्तीरसात न्हाऊन निघाले.
१. ११ जुलै या दिवशी ‘प.पू. अच्युतानंद महाराज शतकोत्तर जन्मोत्सवा’च्या अंतर्गत सकाळी प.पू. अच्युतानंद महाराज (प.पू. भाऊ बिडवई) यांचे नामदेव पायरीचे भजन झाले. त्यानंतर सकाळी ११ ते दुपारी १ या वेळेत प.पू. अच्युतानंद महाराज रचित हिंदी आणि मराठी भजनांचा कार्यक्रम झाला. त्यानंतर सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत श्री. पुष्कराज भागवत आणि मंडळी यांनी ‘अभंगवाणी’ हा भावपूर्ण कार्यक्रम सादर केला.
२. १२ जुलै या दिवशी सकाळी श्रीस्तवन मंजिरी, श्री रामानंद बावनी पाठ आणि श्रींच्या पादुकांची परिसरात शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी ६.३० ते रात्री ९ या वेळेत इंदूर येथील सौ. श्रद्धा जगताप यांचा सुरेल रागदारीसह भजनाचा सुश्राव्य कार्यक्रम झाला. त्यानंतर रात्री १० ते पहाटे ३ वाजेपर्यंत श्री. दीपक बिडवई, श्री. राजू निरगुडकर, श्री. विनीत वरुण निकम, श्री. पवार, श्री. संजय घळसासी आदी भक्तांनी प.पू. भक्तराज महाराजांच्या भजनांची अनेक आवर्तने केली.
३. १३ जुलै या दिवशी सकाळी ११ वाजता वेदमूर्ती श्री. देवगुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीमद् सद्गुरु अनंतानंद साईश, प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांच्या पादुकांचे यथासांग पूजन अन् अभिषेक हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. शीतल ठुसे यांनी केले.
४. या वेळी कार्यक्रमाला उपस्थित असणार्या ३५० हून अधिक महिला भक्तांची ओटी भरण्यात आली.