पत्नीने गळ्यातून मंगळसूत्र काढणे, हा पतीला दिलेला पराकोटीचा मानसिक त्रास ! – मद्रास उच्च न्यायालय

मद्रास उच्च न्यायालय

चेन्नई (तमिळनाडू) – पत्नीने गळ्यातून मंगळसूत्र काढल्याने पतीच्या भावना दुखावल्या जातात. मंगळसूत्र ही एक पवित्र गोष्ट आहे, जी अखंड वैवाहिक जीवनाचे प्रतीक आहेे. मंगळसूत्र हे पतीच्या निधनानंतरच काढले जाते. पती जिवंत असतांना त्याच्या नावाने बांधलेले मंगळसूत्र गळ्यातून उतरवणे, हा पतीला दिलेला पराकोटीचा मानसिक त्रास आहे, असे मत मद्रास उच्च न्यायालयाने एका याचिकेवर आदेश देतांना व्यक्त केले.

१. इरोड येथील वैद्यकीय महाविद्यालयातील प्राध्यापक सी. शिवकुमार यांनी घटस्फोटासाठी प्रविष्ट केलेली याचिका कौटुंबिक न्यायालयाने फेटाळली होती. त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने निर्णय पालटला.

२. शिवकुमार यांच्या पत्नीने न्यायालयात मान्य केले की, तिने गळ्यातून मंगळसूत्र काढले; मात्र मंगळसूत्रातील वाट्या स्वतःकडे ठेवल्या आणि त्यातील साखळी काढून टाकली.

३. महिलेच्या अधिवक्त्यांचे म्हणणे होते की, मंगळसूत्र घालणे महिलेसाठी बंधनकारक नाही. पत्नीने मंगळसूत्र काढल्याने तिच्या वैवाहिक जीवनावर त्याचा काहीही परिणाम होत नाही.

४. यावर न्यायालय म्हणाले की, आपल्याकडील विवाहामध्ये पत्नीच्या गळ्यात मंगळसूत्र बांधणे आवश्यक मानले जाते. त्यामुळे महिलेने गळ्यातून मंगळसूत्र काढणे, हे तिने पतीला जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी उचललेले पाऊल आहे. पतीच्या निधनानंतर पत्नी तिच्या गळ्यातील मंगळसूत्र काढते. त्यामुळे ही कृती महिलेतील पराकोटीची क्रूरता दर्शवते.

५. पतीच्या महाविद्यालयात जाऊन पत्नीने कर्मचारी, विद्यार्थी आणि पोलीस यांच्यासमोर त्याच्यावर विवाहबाह्य संबंधांचे आरोप केले होते. ‘नवर्‍यावर खोटे आरोप करणे हीदेखील एकप्रकारची मानसिक क्रूरता आहे’, असेही न्यायालयाने म्हटले आहे.