महंमद जुबैर याला देहली उच्च न्यायालयाकडून जामीन संमत  

वर्ष २०१८ मध्ये केलेल्या हिंदुविरोधी ट्वीटचे प्रकरण

नवी देहली – ‘अल्ट न्यूज’चा सहसंस्थापक महंमद जुबैर याला देहली पोलिसांनी ५० सहस्र रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन संमत केला. यासमवेतच अनुमती घेतल्याविना त्याच्या देश सोडून जाण्यावर बंदी घातली. जुबैर याला वर्ष २०१८ मधील एका प्रकरणावरून २७ जून या दिवशी अटक करण्यात आली होती. वर्ष २०१८ मध्ये जुबैर याने एक हिंदुविरोधी ट्वीट केले होते. त्याने एका जुन्या चित्रपटातील दृश्य घेऊन त्यात दिसत असलेल्या ‘हनीमून हॉटेल’च्या ऐवजी ‘हनुमान हॉटेल’ असा पालट करून ते ट्वीटमध्ये जोडले होते. त्यासमवेत त्याने लिहिले होते की, वर्ष २०१४ च्या आधी (पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्याआधी) हे ‘हनीमून हॉटेल’ होते, आता त्याचे नाव ‘हनुमान हॉटेल’ आहे. या प्रकरणी जुबैर याला अटक करण्यात आली होती.

महंमद जुबैर याने ‘नूपुर शर्मा यांनी महंमद पैगंबर यांच्या विरोधात केलेल्या कथित आक्षेपार्ह वक्तव्य असलेल्या व्हिडिओमध्ये फेरफार करून तो व्हिडिओ सामाजिक माध्यमांवर प्रसारित केला होता. त्यामुळे जगभरातील मुसलमान देशांनी ‘भारताने मुसलमानांची क्षमा मागावी’, अशी मागणी केली होती. यासह भारतभरात धर्मांध मुसलमानांनी अनेक ठिकाणी दंगली घडवून आणल्या होत्या. या प्रकरणीही जुबैरच्या विरोधात गुन्हा नोंद असूनही अद्याप त्याच्यावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.