‘हर घर तिरंगा’ या उपक्रमात सहभागी व्हा ! – शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

शेखर सिंह, जिल्हाधिकारी, सातारा

सातारा, १५ जुलै (वार्ता.) – भारताला स्वातंत्र्य प्राप्त होऊन ७५ वर्षे पूर्ण होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जनतेच्या मनात स्वातंत्र्यलढ्याच्या स्मृती जागृत व्हाव्यात, स्वातंत्र्यसंग्रामातील ज्ञात-अज्ञात क्रांतीकारकांच्या कार्याची प्रेरणा जनमानसात निर्माण व्हावी, यासाठी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त ‘हर घर तिरंगा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. यामध्ये ११ ते १७ ऑगस्ट या कालावधीत शासकीय कार्यालयासह प्रत्येक नागरिकाने आपल्या घरावर तिरंगा झेंडा फडकवायचा आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. या वेळी विविध शासकीय कार्यालयांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी सिंह म्हणाले, ‘‘जिल्ह्यातील सर्व शासकीय, निम शासकीय कार्यालये, खासगी आस्थापने, स्वयंसेवी संस्था यांनी या मोहिमेत सहभागी व्हावे. आपल्या कार्यालयावर तिरंगा झेंडा लावण्यासह ध्वजसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. प्रत्येक नागरिकाने घरावर तिरंगा झेंडा लावण्यासाठी आणि राष्ट्रध्वजाविषयी जागृती होण्यासाठी विशेष प्रयत्न करावेत.’’