परात्पर गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु (श्रीमती) कुवेलकरआजी यांच्यातील चैतन्य यांमुळे कवळे (गोवा) येथील सौ. रूपा कुवेलकर यांच्यात झालेले पालट

‘साधना करू लागल्यावर सौ. रूपा नागराज कुवेलकर यांच्यात पालट झाल्याचे त्यांचे पती ६३ टक्के आध्यत्मिक पातळीचे श्री. नागराज कुवेलकर यांच्या लक्षात आले. सौ. रूपा कुवेलकर यांच्याविषयी त्यांना जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

सद्गुरु कुवेलकरआजी
सौ. रूपा कुवेलकर
श्री. नागराज कुवेलकर

१. सौ. रूपाच्या माहेरची आणि सासरची पार्श्वभूमी

१ अ. जन्म आणि शिक्षण : ‘माझी पत्नी सौ. रूपा हिचा जन्म ३.३.१९७६ या दिवशी डिचोली येथे झाला. तिला एक भाऊ आणि एक बहीण आहे. सौ. रूपाचे शिक्षण ‘बी.ए.’पर्यंत झाले आहे. तिच्या माहेरी देवधर्माचे विशेष काही नव्हते. त्यामुळे तिची देवावर श्रद्धा अल्प होती.

१ आ. सासरच्या धार्मिक वातावरणामुळे देवावरची श्रद्धा वाढणे : आमचा विवाह वर्ष २००२ मध्ये झाला. आमच्या घरी अनेक पिढ्यांपासून वर्षातून ४ वेळा आमची कुलदेवी श्री शांतादुर्गादेवीची देवकार्ये (कुळाचार) होतात, तसेच श्री गणेशचतुर्थी, श्रावणातील रविवार आणि अन्य काही व्रतेही असतात. त्या वेळी पूर्वसिद्धता आणि सोवळ्याने स्वयंपाक करावा लागत असे. रूपाला या गोष्टींत रुळायला काही काळ गेला. त्यानंतर ते तिला हळूहळू पटू लागले आणि तिची देवावरची श्रद्धा वाढू लागली.

२. नीटनेटकेपणा

हा गुण रूपामध्ये पूर्वीपासून आहे. ‘आपली वास्तू नेहमी स्वच्छ आणि सुंदर असावी’, यासाठी ती सदैव प्रयत्नरत असते.

३. सौ. रूपा यांना देवीच्या संदर्भात आलेल्या अनुभूतींमुळे त्यांची देवीप्रतीची श्रद्धा वृद्धींगत होणे

३ अ. हाता-पायांना कंड येणे, औषधोपचारांचा परिणाम न होणे; पण वैद्यांनी सांगितल्यानुसार कुलदेवीला कौल लावून त्याप्रमाणे करताच कंड न्यून होणे : एकदा तिच्या हाता-पायांना पुष्कळ कंड येऊ लागली. तिच्यावर पुष्कळ औषधोपचार झाले, तरीही त्यांचा परिणाम झाला नाही. तिला एका वैद्यांनी सांगितले, ‘देवीचा कौल घेऊन विचार.’ देवीला कौल लावल्यावर देवीने सांगितले, ‘मी तिला मागितले (सौ. रूपा यांना) आहे.’ (देवीने व्यक्तीला मागणे, म्हणजे ती व्यक्तीच देवीची झाली, अशी मान्यता आहे. – संकलक) तेव्हा रूपाने मंदिरात जाऊन स्वतःच्या हाताने पाणी सोडले. नंतर तिचा त्रास न्यून झाला.

३ आ. महापंचमीच्या दिवशी देवीला शिऱ्याचा नैवेद्य दाखवण्याचे ठरवणे, प्रत्यक्षात दुसरा नैवैद्य करण्याचे ठरल्यावर घरात शिऱ्याचा वास येणे आणि ‘देवीला शिराच हवा आहे’, असे जाणवणे : आमच्या घरात महापंचमीच्या दिवशी देवीला नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे. आमच्याकडे वर्षभरात ५ महापंचमींना कुळाचार असतो. त्यांपैकी एक महापंचमी, म्हणजे नागपंचमीच्या आदल्या दिवशी रूपाने ठरवले, ‘उद्या देवीला शिऱ्याचा नैवेद्य दाखवायचा’; मात्र महापंचमीच्या दिवशी तिने नैवेद्यासाठी वेगळा पदार्थ करायचे निश्चित केले. नंतर काही वेळाने घरात शिऱ्याचा खमंग वास येऊ लागला. देवीने तिला दाखवून दिले, ‘मला शिऱ्याचाच नैवेद्य हवा आहे.’ नंतर रूपाने शिरा बनवून देवीला नैवेद्य दाखवला.

३ इ. प्रतिदिन कुलदेवी आणि दत्तमहाराज यांच्या मंदिरात जाणे अन् ‘देवीला सांगून केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आणि परिपूर्ण होते’, अशी श्रद्धा निर्माण होणे : रूपाला अशा अनेक अनुभूती आल्या आणि त्यानंतर तिची देवीप्रती श्रद्धा वाढू लागली. ती प्रतिदिन कुलदेवी आणि श्री दत्त यांच्या मंदिरात जाऊ लागली. ती कधी कधी कुलदेवीला अभिषेक करायला जाऊ लागली. तिला त्यातून आनंद मिळू लागला. ती स्वयंपाक करतांना आणि नवीन वस्तू घेतांना देवीला सांगू लागली. ‘देवीला सांगून केलेली प्रत्येक गोष्ट चांगली आणि परिपूर्ण होते’, अशी श्रद्धा तिच्यात निर्माण झाली.

४. परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येऊन गेल्यानंतर सौ. रूपाच्या जीवनाला मिळालेली कलाटणी

४ अ. सौ. रूपाचा साधू-संत आणि सनातन संस्था यांवर विश्वास नसणे : पूर्वी ती सनातन संस्था आणि साधक यांचा तिरस्कार करत असे. ती सांगायची, ‘मी साधू-संत यांना मानत नाही. मी केवळ आमची कुलदेवी शांतादुर्गा आणि दत्तमहाराज यांनाच मानते.’ तिला साधक घरी आलेले आवडत नव्हते. ती दैनिक ‘सनातन प्रभात’ वाचत नव्हती.

४ आ. परात्पर गुरु डॉ. आठवले घरी येऊन गेल्यावर सौ. रूपाला आश्रमात सेवेसाठी जाण्याची ओढ निर्माण होणे : एकदा सद्गुरु प्रेमा कुवेलकरआजी यांची (माझ्या आईची) प्रकृती ठीक नव्हती. त्यांना भेटायला परात्पर गुरुदेव आमच्या घरी आले होते. ते घरी येऊन गेल्यानंतर सौ. रूपात पुष्कळ पालट झाला. गुरुदेव घरी येऊन गेल्यावर काही दिवसांनी ती माझ्या समवेत रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात यायला सिद्ध झाली. त्या दिवशी श्री गणेशचतुर्थी होती. त्यानंतर २ मासांनी ती आश्रमात जाऊन टंकलेखनाची सेवा करू लागली.

५. सौ. रूपा साधना करू लागल्यावर त्यांना स्वभावदोषांमुळे होणाऱ्या ​​संभाव्य हानीची जाणीव होणे आणि सद्गुरु कुवेलकरआजींनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन यांमुळे त्यांच्यात पालट जाणवणे

५ अ. परेच्छेने वागणे : पूर्वी ‘घरातील माणसांनी तिच्या बोलण्याप्रमाणे आणि इच्छेनुसार वागावे’, असे तिला वाटत असे. ती साधनेत आल्यापासून तिच्यातील हा स्वभावदोष पुष्कळ प्रमाणात उणावला आहे. आता ती आमच्याशी चर्चा करून प्रत्येक गोष्ट करते.

५ आ. कुटुंबियांकडून अपेक्षा न करणे : पूर्वी तिला घरातील कामे करतांना प्रत्येक व्यक्तीकडून अपेक्षा होती; पण आता तिला कुणाकडूनही अपेक्षा नसते. आता ती सद्गुरुआजींना ‘तुम्ही केवळ साधना करा आणि स्वतःच्या आरोग्याला जपा’, असे सांगते.

५ इ. ‘पूर्वग्रह’ हा स्वभावदोष न्यून होणे : पूर्वी काही घरगुती प्रसंगांमुळे तिच्या मनात नातेवाइकांविषयी पूर्वग्रह निर्माण झाला होता. ‘असे वागणे साधकत्वाला धरून नाही’, याची जाणीव झाल्याने आणि ‘आपली प्रत्येक चूक आपल्याला साधनेपासून दूर घेऊन जाणार आहे’, हे समजल्याने तिच्या वागण्यात पुष्कळ पालट जाणवत आहेत. ती पूर्वी ज्या व्यक्तींशी बोलत नव्हती, त्या व्यक्तींशी ती आता बोलू लागली आहे. ती ‘पूर्वग्रह’ या स्वभावदोषावर स्वयंसूचना घेत होती.

५ ई. मायेतून अलिप्त होणे : पूर्वी तिला आई-वडील आणि बहीण यांची पुष्कळ ओढ होती. ती त्यांच्याशी भ्रमणभाषवर पुष्कळ वेळ बोलत असे. ती साधनेत आल्यापासून तिचा मायेत अडकण्याचा भाग न्यून झाला आहे आणि भ्रमणभाषवर बोलणेही न्यून झाले आहे.

५ उ. तिच्याकडून काही अयोग्य बोलणे झाल्यास ती सद्गुरुआजींची कान पकडून क्षमा मागते.

५ ऊ. साधना करण्याची तळमळ वाढणे : आता ती नामजपादी उपाय, स्वयंसूचना सत्रे, प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करणे, यांत सवलत न घेता ते अधिकाधिक करण्याचा प्रयत्न करते. ‘मी (स्वतः) साधनेत विलंबाने आले’, अशी तिला खंत वाटते.

५ ए. सद्गुरु आणि संत यांच्याप्रती आदर वाढणे : ३०.६.२०१८ या दिवशी घरी पू. आईंना सद्गुरु घोषित करण्याचा सोहळा होता. त्या वेळी घरात संत आणि सद्गुरु असे ९ जण आले होते. ‘ते येणार आहेत’, हे ठाऊक असतांनाही रूपा देवीच्या मंदिरात जाऊन बसली. काही वेळाने ती घरी आल्यावरही खोलीत जाऊन काळोखात बसली. मी तिला चांगली साडी नेसायला सांगितल्यावर तिला राग आला आणि तिने या गोष्टीला नकार दिला. तिच्या या वर्तणुकीवरून तिला ‘संतांचे चैतन्य सहन होत नाही’, असे मला वाटले. सोहळ्याच्या वेळी तिला ‘तुम्ही येऊन बसा’, असे सांगितल्यावरच ती आसंदीवर बसली. आता रूपाला संतांविषयी पुष्कळ आदर वाटतो. घरी संत आल्यावर रूपाला आनंद होतो.

५ ऐ. ‘साधक हेच आता आपले कुटुंब आहे’, अशी जाणीव होणे : साधनेत आल्यानंतर तिच्या मनात सनातनच्या प्रत्येक साधकाप्रती प्रेमभाव वाढला आहे. ‘साधक हेच आता आपले कुटुंब आहे’, अशी तिला जाणीव झाली आहे.

५ ओ. परात्पर गुरुदेवांप्रतीचा भाव : ‘परात्पर गुरुदेव सतत समवेत असतात’, असा तिचा भाव असतो. ती सतत ‘मला परात्पर गुरुदेवांच्या चरणांकडे लवकर जाता येऊ दे आणि मायेतून मुक्त होता येऊ दे’, अशी प्रार्थना करत असते.

‘केवळ ‘परात्पर गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु आजींचे अस्तित्व’ यांमुळे सौ. रूपाच्या स्वभावात पालट झाला आहे’, असे मला वाटते. ‘प.पू. गुरुदेव, तुम्हीच मला रूपाविषयी लिहिण्याची बुद्धी दिलीत आणि माझ्याकडून लिहून घेतलेत, त्यासाठी कृतज्ञता !’

– श्री. नागराज कुवेलकर (पती, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), कवळे, गोवा. (२५.८.२०२१)

या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक