आजपासून ७५ दिवस विनामूल्य ‘वर्धक मात्रा’ ! – केंद्र सरकारची घोषणा

प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर

नवी देहली – केंद्र सरकारने १८ ते ५९ वर्षे वयोगटांतील सर्व नागरिकांना १५ जुलैपासून कोरोना प्रतिबंधक लसीची वर्धक मात्रा (बूस्टर डोस) विनामूल्य देण्याची घोषणा केली. १५ जुलैपासून ७५ दिवस ही मात्रा देण्यात येणार आहे. केंद्रीय माहिती आणि प्रसारणमंत्री अनुराग ठाकूर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

आतापर्यंत ९६ टक्के पात्र नागरिकांना पहिली, तर ८७ टक्के पात्र नागरिकांना दुसरी मात्रा देण्यात आली आहे. तथापि आतापर्यंत १८ ते ५९ वर्षे वयोगटांतील ७७ कोटी लोकसंख्येपैकी १ टक्क्यांहूनही अल्प नागरिकांनी ‘वर्धक मात्रा’ घेतल्याचे आरोग्य मंत्रालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. ६० आणि त्याहून अधिक वयोगटांतील अनुमाने १६ कोटी नागरिकांपैकी अनुमाने २६ टक्के नागरिकांनी वर्धक मात्रा घेतली आहे.