‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’त प्रसिद्ध व्याख्याते दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे घोषित केल्यावर कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘१७.६.२०२२ या दिवशी गोव्यातील श्री रामनाथ देवस्थानात ‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या सायंकाळच्या सत्रामध्ये सर्वांना एक आनंदवार्ता समजली. हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ठाणे येथील प्रसिद्ध व्याख्याते आणि लेखक श्री. दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून ‘हे कर्मयोगी जन्म-मृत्युच्या फेर्‍यांतून मूक्त झाले’, असे घोषित केले. या प्रसंगाचे देवाच्या कृपेने माझ्याकडून झालेले सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

श्री. दुर्गेश परुळकर

१. श्री. दुर्गेश परुळकर यांनी अनेक वर्षे श्री गणेशाची उपासना केल्यामुळे त्यांच्याकडून राष्ट्र आणि धर्म यांची सेवा त्यांना ज्ञानयोगानुसार करता येणे

अधिवेशनामध्ये जेव्हा श्री. दुर्गेश परुळकर विविध विषयांवरील त्यांचे विचार मांडत होते, तेव्हा त्यांच्यावर श्री गणेशाची कृपा होऊन श्री गणेशाचे अस्तित्व जाणवत होते. श्री. दुर्गेश परुळकर यांनी श्री गणेशाची उपासना केल्यामुळे त्यांच्यावर श्री गणेशाचा वरदहस्त असल्यामुळे त्यांना राष्ट्र आणि धर्म यांच्या संदर्भात विविध विषयांचे ज्ञान प्राप्त होते. त्यांची साधना ज्ञानयोगाप्रमाणे चालू असल्यामुळे ते धर्म आणि अध्यात्म यांविषयी विपुल लिखाण करतात. (जेव्हा श्री. दुर्गेश परुळकर यांनी त्यांचे मनोगत व्यक्त केले, तेव्हा त्यांनी ‘मी ४० वर्षांहून अधिक काळ श्री गणेशाची उपासना करत आहे’, असे सांगितले.  – कु. मधुरा भोसले)

२. श्री. दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठल्याचे सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी घोषित केल्यावर सूक्ष्मस्तरावर घडलेली प्रक्रिया

जेव्हा सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी ‘ठाणे येथील हिंदुत्वनिष्ठ श्री. दुर्गेश परुळकर यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून’ ‘ते जन्म आणि मृत्यू यांच्या फेर्‍यातून मुक्त झाले आहेत’, असे घोषित केले. तेव्हा कार्यक्रमस्थळी श्री गणेशाच्या ब्राह्मणस्पति रूपाचे दर्शन झाले. या रूपातील श्री गणेशाला ही आनंद वार्ता ऐकून अत्यानंद झाला होता. त्याने त्याच्या सोंडेने श्री. दुर्गेश परुळकर यांच्या मस्तकावर दैवी फुलांचा वर्षाव करून त्याच्या चैतन्यमय कृपेचा वर्षाव केला. तेव्हा वातावरणात दैवी फुलांचा सुगंध दरवळला आणि सर्वत्र ज्ञानशक्तीचे प्रतीक असणारी पिवळ्या रंगाची दैवी कमलदले उमलल्याचे दृश्य दिसले. या दिव्य ज्ञानकमळांतून सोनेरी रंगाचा दैवी प्रकाशझोत आणि दैवी प्रकाशकण यांचे वायूमंडलात प्रक्षेपण होऊन संपूर्ण वायूमंडलाची शुद्धी झाली. तेव्हा वातावरणातील दाब न्यून होऊन संपूर्ण वातावरण हलके आणि आनंददायी झाल्याचे जाणवले.

३. श्री. दुर्गेश परुळकर यांना त्यांच्या आध्यात्मिक उन्नतीविषयी समजल्यावर त्यांचा भाव जागृत होणे

जेव्हा श्री. दुर्गेश परुळकर त्यांचे मनोगत व्यक्त करत होते, तेव्हा त्यांच्या हृदयातील अव्यक्त अवस्थेत असणारा भाव व्यक्त होत होता. त्यामुळे त्यांचे भावपूर्ण मनोगत ऐकत असतांना श्रोत्यांचा श्री गणेश आणि माता सरस्वती यांच्याप्रतीचा कृतज्ञताभाव जागृत होत होता.

४. श्री. दुर्गेश परुळकर यांची ज्ञानयोग, कर्मयोग आणि भक्तीयोग या तिन्ही योगमार्गांनुसार साधना झाल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती झालेली असणे

कु. मधुरा भोसले

श्री. परुळकर यांनी अनेक वर्षे श्री गणेशाची उपासना केल्यामुळे श्री. दुर्गेश परुळकर यांची बुद्धी शुद्ध झालेली आहे. त्याचप्रमाणे ते ज्ञानयोगी असल्यामुळे त्यांनी ज्ञानाद्वारे माता सरस्वतीची उपासना केलेली आहे. अशा प्रकारे श्री. दुर्गेश परुळकर यांच्यावरील श्री गणेशामुळे बुद्धी आणि माता सरस्वतीमुळे वाणी शुद्ध झालेली आहे. त्यामुळे ते श्री गणेशाच्या कृपेने राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी विपुल लिखाण अन् माता सरस्वतीच्या कृपेने राष्ट्र आणि धर्म यांच्याविषयी प्रभावी वक्तव्य करू शकतात. अशा प्रकारे श्री गणेश आणि माता सरस्वती यांच्या कृपेने श्री. दुर्गेश परुळकर यांच्याकडून समष्टी साधना होत आहे. त्यांच्यातील ज्ञानयोगामुळे त्यांना देवतांकडून ज्ञानप्राप्त होत आहे. त्यांच्यातील कर्मयोगामुळे त्यांच्या मनामध्ये राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करण्याची तळमळ जागृत आहे; त्यामुळे त्यांनी प्राप्त केलेल्या ज्ञानाद्वारे ते समष्टीच्या कल्याणासाठी लिखाण आणि व्याख्यान यांच्याद्वारे प्रभावी धर्मप्रसार करत आहेत. त्यांनी गेल्या जन्मी भक्तीयोगानुसार साधना केल्यामुळे त्यांच्या हृदयात भगवंताविषयी भक्तीभाव जागृत आहे. या भक्तीभावामुळेच त्यांना ज्ञानयोग आणि कर्मयोग यांचे संतुलन साधता येते अन् या दोन्ही मार्गांनुसार समष्टी साधना होते. अशा प्रकारे त्यांना भगवंताची उपासना करण्याची अलौकिक कला अवगत झालेली आहे. अशा प्रकारे श्री. दुर्गेश परुळकर यांची प्रामुख्याने ज्ञानयोग, त्यानंतर कर्मयोग अन् काही प्रमाणात भक्तीयोग या तिन्ही योगमार्गांनुसार व्यष्टी अन् समष्टी साधना झाल्यामुळे त्यांची आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची आध्यात्मिक पातळी ६१ टक्के झालेली आहे.

५. सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी श्री. परुळकर यांना सनातन-निर्मित ‘भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन’ यांचे चित्र भेट दिल्यावर सूक्ष्म स्तरावर घडलेली प्रक्रिया

त्यानंतर सनातन संस्थेचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी श्री. परुळकर यांना सनातन-निर्मित ‘भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन’ यांचे चित्र भेट दिले. तेव्हा चित्रातील भगवान श्रीकृष्णाकडून आशीर्वादरूपी ज्ञानशक्तीचा पिवळसर रंगाचा दिव्य प्रवाह श्री. परुळकर यांच्याकडे गेला आणि हा प्रकाशाचा झोत त्यांच्या आज्ञाचक्रातून त्यांच्या देहात प्रविष्ट झाला. त्यामुळे ज्ञानशक्तीच्या तेजाने त्यांचे आज्ञाचक्र जागृत होऊन त्यांचे आंतरिक ज्ञानचक्षु उघडले. तेव्हा व्यासपिठाच्या ठिकाणी परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे प्रथम अस्तित्व जाणवले आणि त्यानंतर त्यांच्या ठिकाणी भगवान श्रीकृष्णाच्या विराट रूपाचे अन् अर्जुनाला श्रीमद्भगवद्गीतेतून ब्रह्मज्ञान देणार्‍या जगद्गुरु भगवान श्रीकृष्णाचे मला दर्शन झाले. श्रीकृष्णरूपी परात्पर गुरुदेवांनी श्री. परुळकर यांना धर्माचा प्रचार करण्यासाठी दैवी बळ दिल्याचे जाणवले. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेने श्री. परुळकर यांच्यामध्ये ज्ञानतेजासह धर्मतेज आणि ब्राह्मतेज यांची वृद्धी होऊन त्यांच्याकडून लिखाण अन् वाणी यांच्या माध्यमातून प्रभावीपणे धर्मप्रसाराची समष्टी साधना होणार आहे’, असे जाणवले. त्यामुळे त्यांच्याकडून धर्मप्रसाराची सेवा केवळ बौद्धिक स्तरावर न होता ‘भगवंताच्या चरणांची सेवा’, या भावाने म्हणजे आध्यात्मिक स्तरावर होणार आहे. त्यामुळे धर्मप्रसाराच्या सेवेतून त्यांची शीघ्र आध्यात्मिक उन्नती होऊन त्यांची वाटचाल संतपदाकडे चालू झाल्याचे जाणवले.

टीप १ – श्री. परुळकर हे जरी गृहस्थाश्रमी असले, तरी ते ज्ञानी आहेत. त्यामुळे त्यांच्यामध्ये शिवाप्रमाणे वैराग्य प्रबळ आहे. या वैराग्यामुळे त्यांचे मन मायेत न अडकता भगवंताला अनुभवण्याकडे धाव घेत आहे.

टीप २ – श्री. परुळकर हे जरी गृहस्थाश्रमी असले, तरी त्यांच्या मनामध्ये संसाराविषयी मोह किंवा आसक्ती नाही. ते निरासक्त राहून सांसारिक जीवन जगत आहेत. त्यामुळे त्यांना ‘कर्मयोगी संन्यासी’ हे संबोधन प्राप्त झालेले आहे.

श्री गुरुचरणी कृतज्ञता आणि प्रार्थना

श्री गुरूंच्या कृपेमुळे ज्ञानयोगी आणि कर्मयोगी श्री. परुळकर यांच्या आध्यात्मिक उन्नतीच्या सोहळ्यात सहभागी होऊन हा दिव्य सोहळा अनुभवण्याची संधी मिळाली. त्याचप्रमाणे ‘त्यांच्यातील अनेक गुण शिकता आले’, यासाठी मी श्री गुरूंच्या चरणी कोटीश: कृतज्ञता व्यक्त करते. ‘त्यांच्यासारखी जिज्ञासूवृत्ती आणि समर्पणभाव आमच्यामध्ये निर्माण होऊ दे’, हीच श्री गुरूंच्या चरणी विनम्र प्रार्थना आहे.’

– कु. मधुरा भोसले (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६४ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (७.७.२०२२)

श्री. परुळकर यांच्यातील विविध योगमार्गांनुसार असणारी आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.