अशिलाच्या हिताला बाधा आणणार्‍या अधिवक्त्यांंपासून केवळ देवच वाचवू शकतो ! – केरळ उच्च न्यायालय

थिरूवनंतपूरम् (केरळ) – आपल्या अशिलाच्या हितासाठी काम करणे, हे अधिवक्त्यांचे कर्तव्य आहे. यासह एखाद्या संबंधित प्रकरणात त्याला नेमका कायदा आणि तरतुदी काय आहेत, याखेरीज त्यावरील उपाय सांगणे अपेक्षित आहे. आपल्या कोणत्याही कृतीतून त्याने अशिलाच्या हिताला बाधा आणू नये.

न्यायालयाने वारंवार लक्षात आणून देऊही अधिवक्ता त्यांच्या अशिलाच्या हिताच्या विरोधात युक्तीवाद करत आहेत. केवळ देवच अशा अधिवक्त्यांंपासून वाचवू शकतो. मी इथेच हे सूत्र सोडून देतो, असे निरीक्षण केरळ उच्च न्यायालयाने एका याचिकेवर सुनावणी करतांना नोंदवले. राज्यात व्यायामशाळा चालवण्यासाठी ‘केरळ प्लेसेस ऑफ पब्लिक रिसॉर्ट अ‍ॅक्ट, १९६३’ अंतर्गत अनुज्ञप्ती आवश्यक आहे, असा निर्णय देतांना न्यायालयाने हे निरीक्षण नोंदवले. संबंधित नगरपालिकेकडून अनुज्ञप्ती न घेता व्यायामशाळा चालू असल्याने त्याविरोधात ही याचिका प्रविष्ट करण्यात आली होती.