मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी न्यायालयाने बकरी ईदपुरती उठवली

देहराडून – मंगलौर (हरिद्वार) या मुसलमानबहुल शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उत्तराखंड उच्च न्यायालयाने १० जुलै या दिवशी असलेल्या बकरी ईदपुरती उठवली. हरिद्वार येथे मार्च २०२१ मध्ये झालेल्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने उत्तराखंडमधील भाजप शासनाने हरिद्वार जिल्ह्यातील सर्व पशूवधगृहांवर बंदी आणत त्यांची अनुज्ञप्ती रहित केली होती. हा आदेश २ महानगरपालिका, २ नगरपालिका आणि ५ नगर पंचायत यांच्या क्षेत्रांसाठी लागू होता.

सरकारच्या या निर्णयाला फैसल हुसेन या व्यक्तीने न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. या याचिकेत त्यांनी ‘मंगलौर नगरपालिकेच्या क्षेत्रात ९० टक्के मुसलमान रहात असल्याने तेथे पशूवधगृहे चालू करण्याची अनुमती मिळावी’, अशी मागणी केली होती. यावर उत्तराखंड उच्च न्यायालयात ७ जुलै या दिवशी झालेल्या सुनावणीत न्यायालयाने ‘बकरी ईदच्या दिवशी जिल्ह्यातील मंगलौर शहरातील पशूवधगृहांवरील बंदी उठवण्यास आम्ही अनुमती देत आहोत. पशूंची हत्या ही केवळ पशूवधगृहातच करता येईल’, असे स्पष्ट केले.