कृतज्ञताभाव

नरकाच्या दाढेतून परत आणणाऱ्या गुरूंविषयी कृतज्ञतेविना दुसरा कुठला भाव असणार ?

‘समजा मला तुम्ही गुरु मानले, मग तुम्ही जरी मला सोडले, तरी मी तुम्हाला कधीच टाकून देणार नाही. हे आश्वासन सर्वांसाठी आहे. वाघाच्या जबड्यात सापडलेले श्वापद ज्याप्रमाणे सोडले जात नाही, त्याचप्रमाणे ज्याच्यावर गुरूने कृपा केली, तो मोक्षाला जाईपर्यंत गुरु त्याला केव्हाही सोडून देत नाहीत. शिष्य जर नरकात जात असेल, तर भगवान (म्हणजे मी रमण) तुमच्या पाठोपाठ जाऊन तुम्हाला घेऊन परत येतील. ‘तुम्ही अंतर्मुख व्हावे’, अशी परिस्थिती गुरु निर्माण करतो. तुम्हाला आत्म्याकडे म्हणजेच ब्रह्माकडे ओढावे म्हणून गुरु आतही म्हणजे हृदयात तयारी करीत असतो. तुम्ही मला अनन्य व्हा, म्हणजे मी तुमच्या मनाचा मनोनाशापर्यंत ताबा घेतो. तुम्ही स्वस्त रहा. – रमण महर्षी     

कृतज्ञताभाव !

‘एकूणच काय मानवाचे सर्व मर्यादित व ईश्वराचे सर्व अमर्याद असते, उदा. त्याची सर्वज्ञता, सर्वशक्तीमानता, सर्वव्यापकता इत्यादी. म्हणूनच शंकराचार्यांनी म्हटले आहे, ‘ईश्वराबद्दलची कृतज्ञता व्यक्त करायला पृथ्वीएवढा कागद, पर्वताएवढी लेखणी व समुद्राएवढी शाई असेल तरी ती पुरी पडणार नाही.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

कृतज्ञतेतून अनुभवलेली भावावस्था, ध्यानावस्था आणि आनंदावस्था !

प्रत्येक कृती शिकल्यानंतर एकदाच कृतज्ञता व्यक्त होणे आणि प्रार्थना करून १०० वेळा कृतज्ञता व्यक्त करत असतांना २० ते २५ मिनिटे ध्यान लागणे !

‘१३.६.२००८ या दिवशी मी ध्यानमंदिरामध्ये गेलो असतांना ‘प.पू. डॉक्टर प्रतिदिन मला कितीतरी कृती सेवा म्हणून कशी करावी’, हे शिकवत असतात आणि प्रत्येक कृती शिकल्यानंतर मी फक्त एकदाच ‘हे गुरुदेवा तुमच्या चरणी कृतज्ञता व्यक्त करतो’, असे शब्दांमध्ये म्हणतो. त्यामुळे मला समाधान मिळत नव्हते. म्हणून ‘हे गुरुदेवा, तुम्ही एखादी कृती शिकवलीत, तर माझ्याकडून १०० वेळा कृतज्ञता व्यक्त केल्याचा मनामध्ये भाव निर्माण होऊ दे’, अशी प्रार्थना केली आणि त्यानंतर मनात विचार आला, ‘गुरुदेवांनी तसा भाव मनात निर्माण केला, तर मला कसे कळणार ?’ हा विचार येऊन ‘हे गुरुदेवा, ही कृती (सेवा) शिकवल्याविषयी तुमच्या चरणी कृतज्ञ आहे’, असे उभे राहून १०० वेळा म्हणत असतांनाच मला २० ते २५ मिनिटे ध्यान लागले होते. त्या वेळी हृदयामध्ये जो भाव, एकाग्रता निर्माण झाली होती, ती अनुभवत असतांना पुष्कळ आनंद मिळाला. आता मला समजले १०० वेळा कृतज्ञता व्यक्त केल्यावर भाव कसा निर्माण होऊ शकतो.’

– श्री. अशोक नाईक, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

कृतज्ञतापुष्पांजली !

हे गुरुदेवा, तुम्ही व्यष्टी आणि समष्टी साधना शिकवून आमचे जीवन आनंदी केले. सुख-दु:खाच्या भवसागरात आम्ही  गटांगळ्या खात होतो, अंधारात चाचपडत होतो, तेव्हा तुम्ही आम्हाला हात देऊन दिशा दिलीत, प्रोत्साहन दिले. त्यामुळेच आम्ही येथपर्यंतची वाटचाल करू शकलो. तुमची करुणामय दृष्टी आमच्यावर पडताच आम्हाला आमच्या आयुष्यात ज्याची कमतरता होती, ते मिळाल्याचा आनंद झाला. आम्ही ज्याच्या शोधात होतो, ते तुमच्या चरणांशी आम्हाला गवसले. हे प्रीतीवत्सल गुरुदेवा, तुमच्या या कृपेविषयी आम्ही तुमच्या चरणी कोटी कोटी कृतज्ञ आहोत !

देवाप्रतीची निःशब्द कृतज्ञता !

१. देव, तसेच निसर्गातील सर्वजण आपल्यासाठी करत असलेल्या गोष्टींविषयी त्यांचे उपकार जाणून घ्यायला मन आणि बुद्धी अपुरी पडणे किंवा त्याविषयी कृतज्ञताही व्यक्त करतांना निःशब्द होणे !

देव अखंड कार्यरत असतो. तो सर्व माध्यमांतून कृपा आणि निरपेक्ष प्रेम करत असतो; पण त्याविषयी कृतज्ञता व्यक्त करायला निःशब्द व्हायला होते. सर्वजण आपल्यासाठी कितीतरी करत असतात. व्यक्ती, वस्तू, वनस्पती आपल्यावर करत असलेले उपकार आपण फेडू शकत नाही. मला वाटते, ‘हे सर्व पहाण्यास आणि जाणून घेण्यास जन्म अपुरा पडेल.’ प्रत्येक व्यक्ती, वस्तू, वनस्पती, प्राणी यांचे महत्त्व लक्षात येते. उपकार समजून घ्यायला मन आणि बुद्धी दोन्ही अपुरी पडते. आता ‘शिकायला मन आणि बुद्धी नको’, असे वाटते. त्याला मर्यादा येतात.

२. देवाचे आपल्यासाठी राबणे

आपल्यासाठी प्रतिदिन देव कितीतरी करतोे. तो आपल्याला प्रतिदिन झोपवतो. ‘आपल्याला विश्रांती मिळावी म्हणून त्याने रात्र निर्माण केली आहे’, याची जाणीव होते. आपण रात्री झोपल्यावर आपल्याला काहीच कळत नाही. फक्त देवाच्या कृपेने आपण सकाळी जिवंत असतो. त्याच्यामुळे आपल्याला जाग येते आणि आपले अस्तित्व जाणवते. स्वप्नात कुठेही फिरून आलो असलो, तरी सकाळी आपल्याला स्वप्न आणि वास्तव यांतील फरक विचार न करताही कळतो. आपल्याला दैनंदिन कृती लक्षात ठेवाव्या लागत नाहीत. आपोआप आपले शरीर कृती करायला आरंभ करते. आपण अर्धवट झोपेत असलो, तरी आपल्याला विस्मरण होत नाही. आपले शरीर मुखशुद्धी, मल-मूत्र विसर्जन या कृती नियमाप्रमाणे करत असते; पण ते देवाच्या इच्छेनेच होऊ शकते. याही गोष्टी आपल्या हातात नसतातच.

३. देवाने दिलेल्या वस्तू

आपल्याला झोप लागावी, सुख मिळावे यासाठी देवाने अंथरूण, पांघरूण, उशी, पलंग, गादी आणि इतर सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. त्या सर्व वस्तू विनातक्रार आपल्याला वर्षानुवर्षे सांभाळत असतात. आपल्याला त्यांच्या उपकारांची जाणीव नसली तरीही ! आपल्याला स्नानगृह, शौचालय देवाच्या कृपेनेच उपलब्ध होऊ शकते. त्या क्रियांसाठी आपल्याला साहाय्य करण्यासाठी वस्तू आणि पाणी देवानेच उपलब्ध केलेले असते. नळ आहे आणि नळाला पाणीच नसेल, तर आपण काय करणार ? नळात देवानेच पाणी दिलेले असते. ते आपण आपल्याला हवे तेवढे वापरतो. नळाविषयी कृतज्ञता नसते. आज मला वाटले, ‘स्नानगृहाचा दरवाजा म्हणजे देवच आहे. तो आपल्यासाठी सतत उभा राहून आपल्याला संरक्षित करत असतो.’ देवानेच आपल्याला कपडे दिलेले असतात. आपण चांगले दिसावे, यासाठीची माध्यमे दिलेली असतात. देवाने अन्न दिले आहे. पदार्थ करण्यासाठी अग्नी आणि पाणी दिले आहे. पदार्थ रुचकर होण्यासाठी सर्व घटक उपलब्ध करून दिले आहेत. स्वयंपाक आणि जेवण यांसाठी भांडी दिली आहेत.

४. देवाने दिलेले शरीर

देवाने अन्न चावण्यासाठी दात दिले आहेत. अन्न पचवण्याची प्रक्रिया आपल्याच पोटात निर्माण केली आहे. चालायला पाय दिले आहेत. पायांत शक्ती दिली आहे. चालायचे कसे, ते शिकवले आहे. पायांना दगड टोचू नयेत; म्हणून पादत्राणे दिली आहेत. सृष्टी पहाण्यासाठी दृष्टी दिली आहे. आपल्याला आनंद मिळावा; म्हणून सृष्टी सुंदर केली आहे. सुंदरता लक्षात येईल, अशी दृष्टी दिली आहे. सृष्टी रंगीत आहे आणि दृष्टी कृष्णधवल असती, तर आनंद मिळाला नसता. संगणकावर आपल्या इच्छेने, बळाने आपण एक अक्षरही उमटवू शकत नाही. या सर्व आणि यापेक्षाही कितीतरी गोष्टी आपण प्रतिदिन करत असतो. या सर्व गोष्टी आपण सहजरित्या करू शकतो. ती सहजता आपल्याला मिळालेले निरोगी शरीर, मन आणि बुद्धी यांमुळे असते. ते सर्व देवाने आपल्याला दिलेले आहे.

– एक साधिका, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा (८.७.२००८)

स्वत:त भाव असल्याने इतरांना येणाऱ्या अनुभूती !

१. रामनाथी आश्रमातील लागवड विभागातील झाडे पाहून त्यांच्यामध्ये भाव निर्माण झाल्याचे जाणवणे !

‘काही साधकांसमवेत आम्ही रामनाथी आश्रमाच्या वरच्या बाजूला असलेल्या लागवड विभागाला भेट दिली. जेव्हा आम्ही डोंगर चढायला आरंभ केला, तेव्हा ‘प्रत्येक झाड प.पू. डॉक्टरांप्रती असलेला भाव व्यक्त करत आहे आणि सगळ्या झाडांना आपण प.पू. डॉक्टरांचे आहोत’, असे वाटत आहे’, असे जाणवले. त्यानंतर ‘झाडांना एवढा भाव निर्माण करणे कसे शक्य झाले असेल ?’, असा विचार मनात आला. नंतर मी तो विषय विसरून गेले आणि त्या झाडांचे वेगवेगळे रंग अन् सौंदर्य बघू लागले. हे सर्व बघून माझे मन उल्हासित झाले. सगळीकडे झाडांचा गडद हिरवा रंग दिसत होता. झाडांना चांगला बहर आला होता. गेल्या वर्षीपेक्षा यंदा बरीच झाडे वाढली होती. काही नवीन लागवडही तेथे केलेली होती.

२. लागवड विभागाची देखरेख करणाऱ्या साधकाचा भाव पाहून तेथील झाडांमध्ये प.पू. डॉक्टरांप्रती भाव निर्माण झाल्याचा उलगडा होणे

डोंगराच्या शिखराजवळ लागवडीची देखरेख करणाऱ्या साधकांशी आमची भेट झाली. त्यांनी आमचे हसतमुखाने स्वागत केले. त्यांचा प.पू. डॉक्टरांप्रती असलेला भाव आणि झाडांवरील प्रेम पाहून ‘झाडांमध्ये प.पू. डॉक्टरांप्रती भाव कसा निर्माण झाला ?’, या मला आधी पडलेल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले.’

– सौ. लोला वेजिलिच, युरोप (फेब्रुवारी २००८)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक