पोलीस आयुक्तांनी अमरावती शहरातील आतंकवाद्यांची पाळेमुळे उपटली असती, तर उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते ! – कपिल मिश्रा, भाजप नेते

उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांना ‘हिंदु इकोसिस्टिम’ संस्थेकडून ३० लाखांचे साहाय्य !

कपिल मिश्रा

अमरावती – पोलिसांचे दायित्व हे नागरिकांचे संरक्षण करणे आहे; मात्र येथील पोलीस आयुक्त राजकीय दबावात काम करत होत्या. खरेतर १२ आणि १३ नोव्हेंबर २०२१ या दिवशी अमरावती येथे दंगल झाल्यावर पोलीस आयुक्तांनी शहरात दडलेल्या अशा आतंकवाद्यांची पाळेमुळे उपटली असती, तर आज कदाचित उमेश कोल्हे यांचे प्राण वाचले असते, असे मत भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी व्यक्त केले. ‘देशातील सर्वच पोलीस अधिकार्‍यांनी कोणत्याही राजकीय दबावात काम न करता प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडावे’, असे आवाहनही त्यांनी केले.

ते म्हणाले की, ‘इस्लाम खतरे में है’, असे म्हणत देशातील अनेक नेते पत्रकार आणि अधिवक्ते आतंकवाद्यांची पाठराखण करत असल्याविषयी मी खेद व्यक्त करतो. आज देशात हिंदूंच्या हत्या होत आहेत. अशा मंडळींना भानावर आणणे हे आपले कर्तव्य आहे. काही देशविघातक कृत्ये करणार्‍यांनी अमरावती हे ‘एक्सप्रिमेंट ग्राउंड’ असल्याचे सिद्ध केले आहे. याचा प्रारंभ १२ नोव्हेंबर २०२१ या दिवशी झाला. ‘एक को मारो एक लाख को डराओ’, असे त्या देशविघातक कृत्य करणार्‍यांचे धोरण आहे; मात्र ते घाबरवू शकत नाहीत किंवा आम्ही घाबरणार नाही.

उमेश कोल्हे कुटुंबियांना ३० लाखांचे साहाय्य !


देहली येथील भाजपचे नेते कपिल मिश्रा यांनी ७ जुलै या दिवशी येथे येऊन उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलतांना मिश्रा म्हणाले की, देशात जिहादी संघटना एका व्यक्तीची हत्या करून लाखो हिंदूंना घाबरवण्याचा प्रयत्न करत आहेत; मात्र आम्ही प्रत्येक हिंदु कुटुंबाच्या पाठीशी ताकदीने उभे आहोत. उदयपूर येथील कन्हैयालाल आणि येथील उमेश कोल्हे यांच्या कुटुंबियांच्या साहाय्यासाठी हिंदूंना आव्हान करताच अवघ्या २४ घंट्यांत आमच्या ‘हिंदु इकोसिस्टिम संस्थे’त १ कोटी ३० लाख रुपये जमा झाले. कन्हैयालाल यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अतिशय नाजूक असल्यामुळे मी स्वतः उदयपूरला जाऊन कन्हैयालाल यांच्या कुटुंबियांना १ कोटी रुपये दिले आहेत. त्यानंतर उमेश कोल्हे यांचे सुपुत्र संकेत यांच्या बँक खात्यात ३० लाख रुपये जमा केले आहेत. या प्रकरणात न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कोल्हे कुटुंबियांना आम्ही पूर्णतः साहाय्य करू.