सिंधुदुर्गनगरी, ७ जुलै (जि.मा.का.) – जिल्ह्यातील लघु पाटबंधारे प्रकल्प येत्या १-२ दिवसांत पूर्ण क्षमतेने भरून पाणी धरणावरून ओसंडून वहाणार आहे. अशा वेळी धरण परिसरातील नागरिकांनी सतर्क रहावे आणि धरण क्षेत्रामध्ये जाऊ नये, असे आवाहन सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, अंबडपालचे कार्यकारी अभियंता गो.ह. श्रीमंगले यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे. शासकीय माहितीनुसार जिल्ह्यातील १ मध्यम आणि १० लघु पाटबंधारे प्रकल्प सध्या पूर्ण भरले आहेत.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे,
‘‘सिंधुदुर्ग पाटबंधारे विभाग, अंबडपाल या विभागाच्या अधिपत्याखाली जिल्ह्यात २३ लघु पाटबंधारे योजना असून काही प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून (सांडवा म्हणजे एक प्रकारचा कालवा) मोठ्या प्रमाणात पाणी ओसंडून वहात आहे. पावसाचा जोर पहाता धरणांच्या पाणलोट क्षेत्रामधून येणारे पाणी मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पुढील १-२ दिवसांत सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरून पूर्ण संचय पातळीवरील अतिरिक्त पाणी धरणाच्या सांडव्यावरून मोठ्या प्रमाणात ओसंडून वहाणार आहे.
(सौजन्य : zee24taas)
सध्या मुसळधार पडणार्या पावसामुळे धरणावरील नदीमधून वहाणार्या जोरकस प्रवाहामुळे नदीच्या आजूबाजूच्या दरडी कोसळण्याची भीती असून प्रवाहाच्या पाण्याबरोबर जंगलातील जीवजंतू, साप, अजगर यांसारखे सरपटणारे प्राणी धरण जलाशय परिसरात वावरण्याची दाट शक्यता आहे, तसेच विभागाच्या अधिपत्याखालील माडखोल धरण जलाशयातून मोठ्या मगरीने नदीमध्ये प्रवेश केल्याचे आढळून आले आहे. याखेरीज जिल्ह्यातील इतर प्रकल्पांमध्ये मगरीचा वावर असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे जीवितास धोका निर्माण होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत धरण क्षेत्रामध्ये पोहणे, जलक्रीडा करणे, नौकाविहार करणे, तसेच पर्यटन आणि जमावांचे सहलीचे आयोजन करणे आदी गोष्टी करण्यात येऊ नयेत. धरण क्षेत्रामध्ये वावरण्यास प्रतिबंध करण्यात येत आहे.’’