दंगलीच्या गुन्ह्यात अटकेतील २४ संशयितांच्या जामिनावर १३ जुलैला सुनावणी !

मालेगाव (जिल्हा नाशिक) येथील दंगलीचे प्रकरण

प्रतिकात्मक छायाचित्र

मालेगाव – शहरातील दंगलप्रकरणी सध्या ३० जण अटकेत आहेत. यातील काही संशयितांनी जामिनासाठी अर्ज केला आहे. या अर्जांवर ५ जुलै या दिवशी मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या वेळी अन्वेषण अधिकारी अनुपस्थित राहिल्याने सरकारी अधिवक्त्यांनी सुनावणी पुढे ढकलण्याची विनंती केली. उच्च न्यायालयाचे न्यायाधीश नुरुद्दीन जमादार यांनी ही विनंती मान्य करत १३ जुलै या दिवशी सर्व २४ संशयितांच्या जामीन अर्जांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले.

शहरात १२ नोव्हेंबर २०२१ या दिवशी त्रिपुरा येथील घटनेच्या निषेधार्थ बंद पुकारण्यात आला होता. या ‘बंद’ला हिंसक वळण लागून दगडफेक आणि जाळपोळ करण्यात आली. या प्रकरणी शहर आणि आयेशानगर पोलीस ठाण्यांमध्ये वेगवेगळे ५ गुन्हे नोंद झाले आहेत. माजी आमदार आसिफ शेख आणि जनता दलाचे सचिव मुस्तकिम डिग्निटी यांनी काही संशयितांच्या जामिनासाठी स्वतंत्र अधिवक्त्यांद्वारे न्यायालयात जामीन अर्ज प्रविष्ट केले आहेत. आतापर्यंत २८ जणांना जामीन संमत झाला आहे.