चित्रपट निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात भाजपची मुंबई पोलिसांत तक्रार !

लीना मणीमेकलाई

( वरील चित्र प्रसिद्ध करण्यामागे कुणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा हेतू नाही. माहितीसाठी हे चित्र प्रसिद्ध केले आहे. – संपादक )

मुंबई – ‘काली’ या माहितीपटाच्या भित्तीपत्रकामध्ये श्री महाकालीदेवीच्या वेशातील अभिनेत्री सिगारेट ओढतांनाचे छायाचित्र प्रसिद्ध केल्याप्रकरणी भाजपचे महाराष्ट्र राज्याचे सचिव अखिलेश चौबे यांनी निर्मात्या लीना मणीमेकलाई यांच्या विरोधात दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे. माहितीपटाचे लेखक शर्वंथे, छायाचित्रकार ऋषभ कार्ला आणि फातीन चौधरी अन् माहितीपट काढण्यासाठी साहाय्य करणारे राजा राजन यांच्या विरोधातही चौबे यांनी तक्रार केली आहे.

अखिलेश चौबे यांनी तक्रारीत म्हटले आहे की, या माहितीपटाचा ‘प्रोमो’ मागील ३ दिवसांपासून सामाजिक माध्यमांवर प्रसारित होत आहे. या माहितीपटामुळे देशातील कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे या माहितीपटाची निर्मिती करणारे आणि त्यांना साहाय्य करणारे या सर्वांवर गुन्हा नोंदवण्यात यावा.