उदयपूरच्या घटनेला नूपुर शर्मा याच उत्तरदायी ! – सर्वोच्च न्यायालय

देशात विविध ठिकाणी प्रविष्ट गुन्ह्यांवर देहलीत एकत्र सुनावणी घेण्याची नूपुर शर्मा यांची मागणी फेटाळली !

नूपुर शर्मा

नवी देहली – देशात सध्या जे काही चालू आहे, त्याला केवळ ही महिला (नूपुर शर्मा) उत्तरदायी आहे. आरोपी महिलेने कशापद्धतीने भावना भडकावल्या, हे आम्ही दूरचित्रवाहिनीवरील चर्चेत पाहिले. ज्या पद्धतीने या महिलेने वक्तव्य केले आणि नंतर ‘मी एक अधिवक्ता आहे’, असे सांगितले, ते लज्जास्पद आहे. उदयपूर येथील घटनेलाही (कन्हैयालाल यांची जिहाद्यांनी क्रूरपणे केलेल्या हत्येला) या महिलेचे विधानच कारणीभूत आहे. तुम्हाला असे वक्तव्य करण्याची आवश्यकताच काय होती ? या महिलेने संपूर्ण देशाची क्षमा मागितली पाहिजेे, असे मत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केले. नूपुर शर्मा यांनी एका वृत्तवाहिनीवरील चर्चासत्राच्या वेळी महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी त्यांच्यावर देशातील काही भाषांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. यांवर ‘सुरक्षेच्या कारणामुळे देहलीमध्ये एकाच ठिकाणी सुनावणी करण्यात यावी’, अशी मागणी नूपुर शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका करून केली होती. त्यावर सुनावणी करतांना न्यायालयाने वरील मत व्यक्त करत शर्मा यांची याचिका फेटाळून लावत त्यांना उच्च न्यायालयात जाण्यास सांगितले. सुनावणीच्या वेळी नूपुर शर्मा यांनी ‘मला बलात्कार आणि हत्या करण्याची धमकी दिली जात आहे’, असे सांगितले. यावर न्यायालयाने ‘अशा लोकांविरुद्ध गुन्हे नोंदवले पाहिजेत’, असे मत व्यक्त केले.

१. न्यायालयाने नूपुर शर्मा यांनी देशाची क्षमा मागितली पाहिजे, असे म्हटल्यावर त्यांच्या अधिवक्त्यांनी न्यायालयाला सांगितले, ‘शर्मा यांनी क्षमा मागितली आहे.’ त्यावर न्यायालयाने म्हटले की, त्यांनी ‘भावना दुखावल्या असतील, तर..’ असे म्हणत सशर्त क्षमा मागितली होती, तसेच वक्तव्य मागे घेण्यास फार विलंब केला आहे. त्यांनी दूरचित्रवाहिनीवर जाऊन संपूर्ण देशाची क्षमा मागायला हवी. तुमच्या वक्तव्यामुळे देशातील वातावरण बिघडले आहे. तुमच्या वक्तव्यामुळे देशाची अपकीर्ती झाली आहे.

२. नूपुर शर्मा यांच्याविरुद्ध गुन्हा नोंद केल्यानंतरही कारवाई न केल्यावरून न्यायालयाने या वेळी पोलिसांनाही सुनावले. न्यायालयाने म्हटले की, देहली पोलिसांनी तुमच्यासाठी ‘रेड कार्पेट’ (लाल गालीचा) घातले होते. पोलिसांनी या गुन्ह्यावर आतापर्यंत काय कारवाई केली ?, अशी विचारणा केली आहे.

३. न्यायमूर्ती सूर्यकांत देहली पोलिसांना म्हणाले की, एखाद्याविरुद्ध तक्रार नोंदवल्यानंतर तुम्ही त्या व्यक्तीला अटक करतात; पण प्रभाव असलेल्या नूपुर शर्मा यांना हात लावण्याचे धाडस कुणी केले नाही. नूपुर शर्मा या एका पक्षाच्या प्रवक्त्या होत्या, त्यामुळे सत्तेची हवा डोक्यात गेली आहे.

संपादकीय भूमिका

हिंदुद्वेषी चित्रकार म.फि. हुसेन यांनी हिंदूंच्या देवतांची अश्‍लील आणि नग्न चित्रे काढल्यानंतर देशभरात १ सहस्र २०० तक्रारी प्रविष्ट करण्यात आल्या, तर ५ ठिकाणी गुन्हे नोंदवण्यात आले. यांची एकत्रित सुनावणी देहली येथे घेण्यात आली होती, हे जनता विसरलेली नाही !