गौहत्ती येथे बंडखोर आमदारांवर दिवसाला लाखो रुपयांचा व्यय !

पूरग्रस्तांना केवळ २ वाट्या भात आणि एक वाटी डाळ !

मुंबई – आसाम राज्यात आलेल्या भीषण पुरामुळे सहस्रो लोक बेघर झाले आहेत. तेथील लोक अन्न आणि पिण्याचे पाणी यांपासून वंचित आहेत. तेथील लोकांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत; पण शिवसेनेचे बंडखोर आमदार आसाम राज्यातील गौहत्ती येथील ‘रेडिसन ब्लू’ या पंचतारांकित उपाहारगृहात मुक्कामी आहेत. त्यांचा व्यय कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. ‘या पैशांतील काही भाग पूरग्रस्तांसाठी व्यय केल्यास त्यांना आनंद मिळेल’, अशा स्वरूपाच्या प्रतिक्रिया सामाजिक माध्यमांतून उमटत आहेत.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आणि स्थानिक नेत्यांच्या मते, गौहत्ती येथील ‘रॅडिसन ब्लू’मधील खोल्यांसाठी ७ दिवसांचे शुल्क ५६ लाख रुपये आहे. यामध्ये एका दिवसाचे जेवण आणि इतर सेवा यांचा व्यय अनुमाने ८ लाख रुपये आहे. उपाहारगृहामध्ये १९६ खोल्या आहेत. आमदार आणि त्यांच्या समवेत असलेले लोक यांच्यासाठी आरक्षित केलेल्या ७० खोल्यांव्यतिरिक्त व्यवस्थापन नवीन नोंदणी स्वीकारत नाही. आधी नोंदणी झालेले लोक उपाहारगृहात येऊ शकतात. बंडखोर आमदारांनी या मोठ्या उपाहारगृहात रहाण्यासाठी एकूण १ कोटी १२ लाख रुपये व्यय केल्याची माहिती आहे.

‘बोले भारत’ नावाच्या ट्विटर वापरकर्त्याने लिहिले आहे की, ‘रॅडिसन ब्लू’ उपाहारगृहात रहाणार्‍या आमदारांचा खाण्यावर प्रतिदिन ८ लाख रुपयांचा व्यय होतो, तर दुसरीकडे आसाममधील लोकांना पूर साहाय्य निधीच्या नावाखाली केवळ २ वाट्या तांदूळ आणि १ वाटी डाळ वाटली जात आहे.