२८.१०.२०२१ या दिवशी सोलापूर सेवाकेंद्रातील कु. दीपाली मतकर या सनातनच्या ११२ व्या संत झाल्याचे घोषित करण्यात आले. सोलापूर सेवाकेंद्रातील सौ. स्नेहा भोवर यांच्या लक्षात आलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. प्रीती
१ अ. साधक रुग्णाईत झाला, तर पू. दीपालीताईंनी त्याची काळजी घेणे आणि त्यांच्या प्रेमळ शब्दांतूनच साधकांचे आजार अर्धे बरे होणे : ‘पू. दीपालीताई कधी आमच्या आई, कधी मुलगी, तर कधी बहीण होऊन सर्व साधकांची अविरत काळजी घेतात. कधी एखादा साधक रुग्णाईत झाल्यास त्या लगेच आधुनिक वैद्यांना विचारून त्या साधकाला औषधे देतात. त्यांच्या प्रेमळ शब्दांतूनच साधकांचे आजार अर्धे बरे होतात. गुरुदेव (परात्पर गुरु डॉ. आठवले), तुम्ही अशी माऊली (पू. दीपालीताई) आम्हाला दिली आहे; पण गुरुदेवा, आम्ही पुष्कळ न्यून पडतो.
१ आ. साधकांच्या समवेत त्यांच्या कुटुंबियांचीही काळजी घेणे : त्या केवळ साधकांची काळजी न घेता त्यांच्या कुटुंबियांचीही विचारपूस करतात. ‘त्यांना काय अडचणी आहेत ?’, हे जाणून घेऊन त्यांना मार्गदर्शन करतात आणि त्यातून त्यांना बाहेर काढतात. ‘परम पूज्य (परात्पर गुरु डॉ. आठवले), जसा तुम्ही आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ साधकांचा व्यापक विचार करता, तसाच पू. दीपालीताई करतात.’
२. साधकांना आधार देणे
सेवाकेंद्रातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत त्या कधी लहान होऊन, तर कधी मोठ्या होऊन सर्वांनाच आधार देतात. ‘साधक सतत आनंदी असावा’, असे त्यांना वाटत असते. साधकाच्या तोंडवळ्यात काही पालट दिसला, तर त्या लगेच मायेने विचारतात, ‘‘काय झाले ? बरे वाटत नाही का ? कसली काळजी करता का ?’’ त्या साधकांना आनंदी ठेवण्यासाठी सतत प्रयत्न करतात.
३. सेवेची तळमळ
३ अ. कोणतीही सेवा पुष्कळ आनंदाने आणि उत्साहाने करणे : कुठलीही सेवा असो, पू. दीपालीताई ती सेवा भाव ठेवून तळमळीने, चिकाटीने, उत्साहाने आणि आनंदाने करतात. मला पू. दीपालीताई यांच्याकडून पुष्कळ शिकायला मिळते. त्या प्रसार, सेवाकेंद्र, स्वयंपाकघर या संदर्भातील सेवा असोत किंवा साधकांच्या साधनेतील अडचणी सोडवणे असो, अशा कोणत्याही सेवा असल्या, तरी सर्वकाही मोठ्या उत्साहाने पार पाडतात. त्यांची महती वर्णावी, तेवढी अपुरीच आहे.
३ आ. गहू खराब झाल्यावर सर्व साधकांसह स्वतःही रात्रभर जागून गहू चाळणे : एकदा सेवाकेंद्रात गहू खराब झाले. तेव्हा ‘गुरुधनाचा एकही कण वाया जाऊ नये आणि साधकांनी कष्टाने अर्पण मिळवलेले गहू वाया जाऊ नयेत’, यासाठी पू. दीपालीताईंनी रात्रभर जागून सहसाधकांच्या समवेत ते गहू चाळले. त्या वेळी त्यांच्या डोळ्यांत पाणी आले होते.
४. ‘साधक मायेत अडकू नयेत’, यासाठी प्रयत्नरत असलेल्या पू. दीपालीताई !
गुरुदेव, ‘साधक कुठे मायेत अडकू नयेत’, यासाठी पू. दीपालीताईंचा प्रयत्न असतो. साधकांनी घरी जातांना सांगितलेल्या वेळेत ते सेवाकेंद्रात परत आले नाहीत, तर पू. दीपालीताई त्यांना स्वतः भ्रमणभाष करून त्यांची विचारपूस करतात. ‘‘तुम्ही कधी येता ? आम्ही तुमची वाट पहातो’’, या शब्दांमध्ये त्या साधकांना सेवाकेंद्रात बोलावतात. ‘एखादी आई बाळाची आतुरतेने वाट पहात आहे आणि त्याला प्रेमाने बोलावत आहे’, असे वाटून साधकाचा भाव जागृत होतो. त्यामुळे त्याला आपण ‘लवकर सेवाकेंद्रात जायला पाहिजे’, असे वाटते. पू. दीपालीतार्ईंचा ‘साधक परत मायेत अडकू नयेत आणि त्यांनी सेवाकेंद्रात येऊन साधना करावी’, असा एकच ध्यास असतो.
‘गुरुदेव, तुम्हीच आम्हाला पू. दीपालीताईंच्या माध्यमातून घडवणार आहात. त्यांच्यासारखे गुण आमच्यात येऊ देत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– आपली चरणसेवक, सौ. स्नेहा भोवर, सोलापूर सेवाकेंद्र, सोलापूर. (२९.१२.२०२१)