रशियामध्ये भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्यासाठी पुतिन आणि मोदी यांच्यात चर्चा !

(‘रिटेल चेन्स’ म्हणजे एकाच आस्थापनाची विविध ठिकाणी असलेली दुकाने)

मॉस्को (रशिया) – आम्ही भारताला तेलाचा विक्रमी पुरवठा केला आहे. आता आम्ही भारतीय ‘रिटेल चेन्स’ उघडण्याविषयी चर्चा करत आहोत, असे वक्तव्य रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी केले. ते ‘ब्रिक्स बिझनेस फोरम्’च्या ऑनलाईन कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करत होते. कार्यक्रमाला पंतप्रधान मोदीही उपस्थित होते. ‘ब्रिक्स’ म्हणजे ब्राझिल, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या देशांत विविध स्तरांवरील परस्पर संबंध दृढ व्हावे, यासाठी बनवण्यात आलेला गट आहे.

पुतिन पुढे म्हणाले की, रशिया आणि ‘ब्रिक्स’ देशांतील व्यावसायिक विश्‍वात संपर्क वाढत आहे. चीन आणि भारत यांना केलेल्या रशियन तेलाच्या निर्यातीत उल्लेखनीय वाढ झाली आहे. युक्रेन युद्ध चालू झाल्यानंतर जून मासामध्ये प्रतिदिन १० लाख बॅरल कच्चे तेल भारताला निर्यात करण्यात येत आहे. या बैठकीमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग हेही ऑनलाईन सहभागी झाले होते.