आषाढी वारीनिमित्त सोलापूर रेल्वे विभागाकडून १० दिवसांत १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन !

सोलापूर – पंढरपूर येथे १० जुलै या दिवशी होणाऱ्या आषाढी वारी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर रेल्वे विभागाकडून १० दिवसांत रेल्वेच्या १२५ विशेष फेऱ्यांचे नियोजन केले असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली आहे. आषाढी एकादशीच्या निमित्ताने पुणे-पंढरपूर, कुर्डूवाडी-मिरज, लातूर-मिरज, भुसावळ-पंढरपूर, नागपूर-पंढरपूर, बिदर-पंढरपूर आदी मार्गांवर विशेष रेल्वे धावणार आहेत. या गाड्यांमध्ये सर्वसामान्य (जनरल) तिकिटावर वारकऱ्यांना प्रवास करता येणार आहे.

आषाढी एकादशीसाठी मराठवाडा, कान्हादेश यांसह पश्चिम महाराष्ट्रातून लाखो वारकरी पंढरपूर येथे श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. या वर्षी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने वारकऱ्यांच्या सोयीसाठी ५ जुलै ते १५ जुलै या कालावधीत विशेष रेल्वेचे नियोजन केले आहे. प्रवाशांसाठी रेल्वे स्थानकावर पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहे, उपहारगृह, रुग्णवाहिका, चौकशी कक्ष, संगणकीय उद्घोषणा कक्ष अशा सुविधा करण्यात येणार आहेत.