पुणे, २१ जून – संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी यंदा मोठ्या प्रमाणात होणारी गर्दी लक्षात घेता पुणे पोलिसांनी व्यापक स्तरावर नियोजन केले आहे. कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये, यांसाठी ४ सहस्र पोलिसांसमवेत राज्य राखीव पोलीस, विशेष शाखा, गुन्हे शाखेतील पोलीस यांचा समावेश आहे.
पालखी सोहळा, पालखी मार्ग यांची सर्व माहिती नागरिक, वाहनचालक यांना मिळावी यांसाठी diversion.punepolice.gov.in हे ‘वेबपेज’ पुणे पोलिसांनी सिद्ध केले आहे. यावर नागरिकांना बंद आणि चालू असलेले रस्ते, तसेच अन्य माहिती मिळणार आहे. यामुळे भाविकांची असुविधा टळण्यास साहाय्य होणार आहे. ‘‘कोरोनाच्या २ वर्षानंतर यंदा पालखी सोहळा होणार आहे. त्यासाठी भाविक मोठ्या संख्येने येण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालखी सोहळा आणि भाविक यांच्या सुरक्षिततेला सर्वाधिक प्राधान्य देऊन कडक बंदोबस्त ठेवला आहे. चोरीच्या घटना रोखण्यासमवेतच कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, गुन्हे शाखेची पथके कार्यरत आहेत’’, अशी माहिती पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी दिली.