देहू (जिल्हा पुणे) – मनी विठूभेटीची ओढ, मुखी ज्ञानोबा-तुकारामचा घोष, खांद्यावर भगव्या पताका आणि आसमंत दुमदुमन सोडणारा टाळ-मृदुंगाचा गजर, अशा अत्यंत भक्तीमय वातावरणात संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे २० जून या दिवशी श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान झाले. कोरोना महामारीमुळे गेली २ वर्षे पायी पालखी सोहळा होऊ शकला नव्हता.
(सौजन्य : News18 Lokmat)
यंदा मात्र प्रत्यक्ष पायी सोहळा होत असल्याने वारकर्यांच्या आनंदाला पारावर उरला नव्हता. सकाळी ७ वाजता तपोनिधी नारायण महाराज समाधी महापूजा, संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त, वंशज वारकरी यांच्या हस्ते पार पडली. त्यानंतर पालखी प्रस्थान सोहळ्यानिमित्त ह.भ.प. रामदास महाराज मोरे (देहूकर) यांचे काल्याचे कीर्तन झाले. त्यानंतर इनामदार वाड्यात श्री संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन झाले. दुपारी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार, रोहित पवार, आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचे पूजन झाले. त्यानंतर संत तुकाराम महाराजांच्या पालखीने पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले.