हिंदु संस्कृतीतील विविध उपासनामार्ग, सण-उत्सव, आचारविचार, आहारविहाराच्या पद्धती यांतूनच नव्हे, तर दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृतीतूनच सत्त्वगुण वाढेल, म्हणजे साधना होईल, अशी योजना हिंदु धर्मात आहे. हे हिंदु धर्माचे अद्वितीय वैशिष्ट्य आहे. हिंदु धर्मानुसार आचरण करणे, म्हणजे ईश्वराच्या जवळ जाण्यासारखे आहे. दैनंदिन धार्मिक कृती, उदा. पूजाअर्चा, आरती, प्रासंगिक सण आणि उत्सव शास्त्र समजून घेऊन करणे; तसेच कुलाचार, कुलपरंपरा सांभाळणे, यालाच ‘धर्माचरण’, असे म्हणतात. धर्मानुसार स्वतः आचरण केले पाहिजे आणि धर्माचरणाचा कार्यकर्ते, हिंदु समाज यांच्यातही प्रसार केला पाहिजे.