रशियाकडून युरोपला होणार्‍या गॅसच्या पुरवठ्यात घट : युरोपमध्ये हाहाःकार उडण्याची शक्यता !

मॉस्को (रशिया) – रशियाने अन्य देशांना, विशेषतः युरोपीय देशांना करण्यात येणार्‍या गॅसच्या पुरवठ्यात घट करण्याची घोषणा केली. एवढेच नव्हे, तर गॅसच्या किमती ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्यात आल्या आहेत. रशियाच्या या निर्णयामुळे युरोपमध्ये ४० टक्के गॅसचा पुरवठा अल्प होणार असल्याने तेथे हाहाःकार उडण्याची शक्यता आहे. रशियाच्या या निर्णयाचा सर्वाधिक फटका जर्मनी आणि इटली या देशांना बसणार आहे.

याविषयी रशियाने म्हटले आहे, ‘कॅनेडातून उपकरणे येण्यास विलंब झाल्याने आम्हाला निर्णय घ्यावा लागला. यासह रशियातून युरोपमध्ये ‘नॉर्ड स्ट्रीम वन पाइपलाइन’द्वारे जाणार्‍या गॅस प्रकल्पाची दुरुस्ती करायची असल्याने त्याचा गॅसच्या पुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो.’ युक्रेनविरुद्धच्या युद्धात अमेरिकेसह अनेक युरोपीय देशांनी एकत्र येऊन रशियावर कठोर निर्बंध लादले आहेत. असा निर्णय घेऊन त्या देशांना रशियाने रोखठोक प्रत्युत्तर दिल्याचे सांगितले जात आहे.