श्री रुक्मिणीदेवीच्या चरणांचे पुरातत्व विभागाकडून संवर्धन !

श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीच्या चरणांची झीज झाल्याचे प्रकरण

श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीच्या चरणांचे संवर्धन करतांना 

पंढरपूर (जिल्हा सोलापूर) – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, संभाजीनगर यांनी पहाणी केल्यानुसार श्री विठ्ठलाची मूर्ती सुस्थितीत आहे; मात्र श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीच्या चरणांची झीज झाली आहे. श्री रुक्मिणीदेवीचे चरण वगळता इतर कोणत्याही भागाची झीज झालेली नाही, मूर्ती सुस्थितीत आहे. त्यामुळे भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, संभाजीनगर यांनी दिलेल्या अहवालानुसार श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीच्या चरणांचे संवर्धन करण्यास मंदिर समितीच्या १२ मे या दिवशी झालेल्या सभेत मान्यता देण्यात आली होती. त्यानुसार ११ आणि १२ जून या दिवशी उपअधीक्षक, पुरातत्व रसायनतज्ञ, संवर्धन संशोधन प्रयोगशाळा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विज्ञान शाखा, संभाजीनगर यांच्या वतीने श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीच्या केवळ चरणांचे संवर्धन करण्यात आले. या संवर्धन वेळेत श्रींचे नित्योपचार परंपरेनुसार चालू होते आणि श्रींचे मुखदर्शनही चालू आहे.

श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीच्या चरणांची झीज होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मंदिर समितीने उपअधीक्षक, पुरातत्व रसायनतज्ञ, संवर्धन संशोधन प्रयोगशाळा, भारतीय पुरातत्व सर्वेक्षण, संभाजीनगर यांच्याकडे माहिती देऊन उचित कार्यवाही करण्याची विनंती केली होती.

संपादकीय भूमिका

  • विविध क्षेत्रांतील अडचणींवर त्या त्या क्षेत्रातील तज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाते. मंदिर हा हिंदु धर्माशी संबंधित विषय आहे. त्यामुळे मूर्तीची झीज आणि त्यांवरील उपायांच्या संदर्भात हिंदु धर्मातील अधिकारी व्यक्ती, म्हणजे शंकराचार्य, संत, धर्माचार्य आदींचे मार्गदर्शन घेऊन कृती करायला हव्यात.  
  • धर्मशास्त्रविसंगत रासायनिक लेपन यापूर्वी अनेक वेळा करूनही श्री रुक्मिणीदेवीच्या मूर्तीची झीज थांबलेली नाही. तरी पुन्हा हीच प्रक्रिया करून काय साध्य होणार आहे ?
  • रासायनिक लेपन प्रकियेत विविध रासायनिक द्रव्यांचा वापर केल्याने मूर्तीच्या सात्त्विकतेत घट होते. या प्रक्रियेत मूर्तीवर रासायनिक द्रव्यांचे लेपन करण्यात येते. परिणामी मूर्तीच्या मूळ रूपात पालट होतात. मूर्तीच्या रूपात पालट झाल्यास मूर्तीतून प्रक्षेपित होणाऱ्या चैतन्याचे प्रमाण घटते. परिणामी भाविक मूर्तीच्या आध्यात्मिक लाभापासून वंचित राहू शकतात.