‘दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशना’च्या पहिल्या दिवसाचे श्री. राम होनप यांनी केलेले सूक्ष्मातील परीक्षण

१२.६.२०२२ या दिवशी गोवा येथील ‘श्री रामनाथ देवस्थान’ येथे दशम अखिल भारतीय हिंदु राष्ट्र अधिवेशनाला आरंभ झाला. याचे देवाने माझ्याकडून करवून घेतलेले सूक्ष्मातील परीक्षण पुढे दिले आहे.

१. दीपप्रज्वलन करणे

कार्यक्रमाच्या आरंभी दीपप्रज्वलन करण्यात आले. स्वामी संयुक्तानंद यांनी दीप प्रज्वलित केल्यावर वातावरणात सूक्ष्मातून चंदेरी रंगाचे दैवी कण प्रक्षेपित झाले. पू. (अधिवक्ता) हरि शंकर जैन यांनी दीप प्रज्वलित केल्यावर वातावरणात सोनेरी रंगाचे दैवी कण प्रक्षेपित झाले. या कणांमध्ये ‘चैतन्य’ आणि ‘ज्ञान’ यांचे मिश्रण होते. सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी दीप प्रज्वलित केल्यावर वातावरणात मोठ्या प्रमाणात पिवळ्या दैवी लहरींचे प्रक्षेपण झाले.

श्री. राम होनप

२. मंत्रपठण करणे

‘अधिवेशन निर्विघ्नपणे पार पडावे’, यासाठी सनातन संस्थेच्या पुरोहित-साधकांनी काही मंत्रोच्चार केले. त्यामुळे अधिवेशनाच्या ठिकाणी आलेल्या काही वाईट शक्तींची शक्ती न्यून झाली, तसेच अधिवेशनाला विरोध करण्यासाठी पाताळांतून येणाऱ्या काही वाईट शक्तींना वरती येण्यास प्रतिरोध होत होता.

३. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन

परात्पर गुरु डॉक्टरांनी अधिवेशनाच्या निमित्ताने दिलेल्या संदेशाचे वाचन सनातन संस्थेचे सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले. त्या वेळी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.

अ. माझा भाव जागृत झाला.

आ. ‘संदेश ऐकू येऊ नये’, यासाठी काही वाईट शक्तींनी त्यांचे कान बंद करण्याची कृती केली.

इ. संदेशाचे वाचन चालू असतांना पाताळांत संपूर्ण शांतता होती; कारण संदेश सर्व वाईट शक्ती ऐकत होत्या. एरव्ही पाताळांत पुष्कळ गोंधळाचे वातावरण असते.

ई. संदेशाच्या शेवटी परात्पर गुरु डॉक्टरांचे ‘या अधिवेशनाच्या माध्यमातून सर्वांना हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रेरणा मिळो’, असे वाक्य होते. त्या वेळी पाताळातील एक वाईट शक्ती सूक्ष्मातून म्हणाली, ‘याला विरोध करण्यासाठी आम्हाला रक्ताची नदी सिद्ध करावी लागेल.’

उ. ‘सद्गुरु सत्यवान कदम यांच्या चैतन्यमय वाणीमुळे या संदेशाचा परिणाम वातावरणात दूर अंतरावर होत आहे’, असे मला जाणवले.

४. कोरोनाच्या काळात मृत पावलेले राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना श्रद्धांजली वहाणे

कोरोनाच्या काळात मृत पावलेले राष्ट्रप्रेमी, धर्मप्रेमी आणि साधक यांना अधिवेशनाला उपस्थित असलेल्यांनी श्रद्धांजली वाहिली. त्या वेळी पुरोहित-साधकांनी दत्तगुरूंचा एक श्लोक म्हटला. श्लोक चालू असतांना अधिवेशनाच्या ठिकाणी ‘सूक्ष्मातून काही लिंगदेह हात जोडून उभे आहेत’, असे मला दृश्य दिसले. त्या वेळी श्लोकातून लिंगदेहांना ईश्वरी शक्ती मिळत होती. श्लोक पूर्ण झाल्यावर काही लिंगदेह अन्य ठिकाणी निघून गेले, तर काही अधिवेशनाच्या ठिकाणीच थांबले.

५. अधिवक्ता विष्णु शंकर जैन यांचे मार्गदर्शन

अ. अधिवक्ता जैन हे प्रख्यात अधिवक्ता असूनही त्यांचा अहं अल्प आहे. त्यांच्यात गुरु आणि देवता यांच्याविषयी पुष्कळ भाव आहे. त्यामुळे त्यांच्या हातून मोठे धर्मकार्य घडत आहे.

आ. अधिवक्ता जैन बोलत असतांना माझा भाव जागृत झाला. त्या वेळी त्यांच्यामागे भगवान शिव असून तो ‘अधिवक्ता जैन यांना आशीर्वाद देत आहे’, असे मला दृश्य दिसले.

इ. अधिवक्ता जैन यांच्यावर श्री सरस्वतीदेवीची विशेष कृपा आहे.  मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमी, काशी येथील ज्ञानवापी मशीद यांसारख्या विविध विषयांवर हिंदु धर्मासाठी न्यायालयीन लढे लढण्यासाठी आवश्यक ते ज्ञान अधिवक्ता जैन यांना श्रीसरस्वती देत असते. त्यामुळे अधिवक्ता जैन यांना योग्य वेळी आणि योग्य तो ईश्वरी विचार ग्रहण करता येतो. ईश्वरी अधिष्ठान असल्याने  त्यांच्या हातून धर्मकार्य गतीने आणि परिणामकारक होण्यास साहाय्य होते.’

– श्री. राम होनप (सूक्ष्मातून प्राप्त झालेले ज्ञान), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१२.६.२०२२)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत
  • सूक्ष्म परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म परीक्षण’ म्हणतात.
  • या अंकात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक